वादग्रस्त विधान आणि अभिनेत्री केतकी चितळे हे एक समीकरण आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बऱ्याच मालिकांमधून केतकी प्रेक्षकांच्या भेटीस आली. मात्र आता केतकी सध्या अभिनयक्षेत्रात कार्यरत नसल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावर ही जोडी बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. बरेचदा राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर ती भाष्य करताना दिसते. केतकीने शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टवर ती नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकलेली पाहायला मिळाली आहे. (Ketaki Chitale Post)
अशातच अभिनेत्रीने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सर्वत्र मतदानाचा जोर असलेला पाहायला मिळत आहे.पक्ष प्रचार सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच मुंबईतील वायव्य मुंबई मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर निवडणुक लढवत आहेत. अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाला होता. दरम्यान त्याचा व कीर्तीकर यांचा संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट केली आहे.

“लाज कशी वाटत नाही ठाकरे तुम्हाला? लकी पेट्रोल पंप उडाला (जो आम्हाला त्यावेळी ट्रकचे टायर फुटले असावे वाटले आवाज ऐकून) त्यातील आरोपीला स्टार प्रचारक म्हणून मिरवताय? कीर्तिकरांना तसेही मी मत देणार नव्हतेच पण आज बाळासाहेबांमुळे जो काही ०.०००१ टक्के आदर मनात होता तुमच्याविषयी, तोही तुम्ही मातीत मिळवण्यात यशस्वी झाला आहात. राग, चीड, द्वेष, संताप अशा भावना देखील मनात येत नाही आहेत. येते आहे ती फक्त कीव,” अशी पोस्ट केतकीने केली आहे. केतकीची ही इन्स्टाग्राम पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारयात्रेत मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा सहभागी झाला होता आणि तो कीर्तीकर यांच्याबरोबर आहे, असा गंभीर आरोप भाजपाने केला. भाजपाने केलेले हे गंभीर आरोप कीर्तिकर यांनी फेटाळून लावले आहेत. प्रचारयात्रेत ४००-५०० लोक येतात, जवळ येऊन स्वत:ची ओळख करून देतात. जर इक्बाल मुसा हा बॉम्बस्फोटातील आरोपी आहे, तर मग तो बाहेर कसा? असा उलट प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.