‘पारू’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे. सातारा येथे मालिकेचं चित्रीकरण सुरु आहे. मालिकेत पारू ही भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. तर आदित्यच्या भूमिकेत प्रसाद जवादे पाहायला मिळत आहे. पारू व आदित्यच्या जोडीलाही प्रेक्षक पसंती दर्शवित आहेत. तर मालिकेतील अहिल्यादेवी या वजनदार भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. अहिल्यादेवी हे पात्र अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारताना दिसत आहे. मुग्धा कर्णिकच्या भूमिकेचं बरंच कौतुक होताना दिसत आहे. (Mugdha Karnik Angry)
अशातच मुग्धा कर्णिक विशिष्ट मुद्द्यामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच मुग्धाने तिच्याबरोबर घडलेल्या एका व्यवहारानंतर संताप व्यक्त केला आहे. बरेचदा कलाकार मंडळी सामाजिक व राजकीय विषयांवर उघडपणे भाष्य करताना दिसतात. अशातच अभिनेत्रीने तिला वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका अनुभवावर भाष्य केलं आहे.

मुग्धाने शेअर केलेल्या एका इन्स्टास्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्रीने एका नामांकित बँकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. एटीएम (ATM) मधून पैसे काढल्यावर फाटलेल्या नोटा आल्या असल्याचा फोटो शेअर करत तिने एक पोस्टही शेअर केली आहे. या पोस्टमध्ये फाटलेल्या नोटांचा फोटो शेअर केला आहे.
पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की, “एका नामांकित बँकेच्या एटीएममधून आज अशाप्रकारच्या नोटा आल्या. याबद्दल त्यांच्याकडे तक्रार किंवा विचारणा करायची असल्यास तर, कस्टमर केअर नंबरसुद्धा सुरु नाही. आता ही समस्या मी कशी सोडवू? त्यांना फोन केल्यावर तक्रार निवारण करण्याचे विशिष्ट विभाग असतात त्याच तुमची समस्या समाविष्ट नसेल तर पुढे काहीच होत नाही. #needtochangemybank (मला बँक बदलण्याची गरज आहे)”, असं म्हटलं आहे.