या डिजिटल युगात सोशल मीडियाचे स्तोम अधिकच माजले आहे. या सोशल मीडियाचे जितक्या सकारात्मक गोष्टी आहेत. तितक्याच नकारात्मक गोष्टीही आहेत आणि यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रोलिंग. कलाकारांनाही या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. या ट्रोलिंगवर काही कलाकार शांत राहणे पसंत करतात. पण काही कलाकार मात्र यावर अगदी बिनधास्तपणे आपलं मत व्यक्त करतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.
मराठी सिनेसृष्टीतील स्पष्टवक्ती, रोखठोक व बिनधास्त अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीचं नाव आवर्जून घेतलं जातं. एखाद्या विषयावर आपलं स्पष्ट मत व्यक्त करणे असो वा कुणालाही सडेतोड उत्तर देण्यास ही अभिनेत्री मागे राहत नाही. त्यामुळे हेमांगी कवी सोशल मीडियावर अधिक चर्चेत असते. सोशल मीडियाद्वारे ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
हेमांगीने नुकतंच दीक्षा सोनलकर या अभिनेत्रीबरोबर ‘यिम्मी यिम्मी’ या गाण्यावर रील व्हिडीओ केला होता. यामध्ये त्या एका विशिष्ट डान्स स्टेपवर नाचताना पाहायला मिळत आहेत. काल (२९ एप्रिल) आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला अनेकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मात्र या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक” असं म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.

हेमांगीने नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेला इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिउत्तर दिले आहे. हेमांगीने या कमेंटला इन्स्टाग्राम स्टोरीवर उल्लेख करत “आम्हाला प्रसिद्धीची काहीही गरज नाही लांडगेदादा, आम्ही आधीपासूनच प्रसिद्ध आहोत” असं म्हटलं आहे. दरम्यान, हेमांगीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री सध्या कैसे मुझे तूम मिल गये’ या हिंदी मालिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.