झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमधून डॉ. निलेश साबळेने हसताय ना मंडळी? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्याच्या याच ब्रीदवाक्याला घेऊन कलर्स वाहिनीवर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ हा नवीन कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच अनेकांना या कार्यक्रमाविषयी उत्सुकता लागून राहिली होती. अशातच नुकताच याचा पहिला भाग प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते यांच्यासह केदार शिंदेदेखील यात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमामध्ये ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्याबरोबरच सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम व रोहित चव्हाण आदी कलाकारांचाही समावेश आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये ओंकार, भाऊ व बाकी कलाकारांनी ‘बाईपण भारी देवा’मधील भूमिकांचे सादरीकरण करुन उपस्थित कलाकारांचे मनोरंजन केले. याच भागाचा एक व्हिडीओ कलर्स वाहिनीवरील शेअर करण्यात आला आहे. कसा वाटला भाग असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि यावर प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रियादेखील व्यक्त केल्या आहेत.\

या व्हिडीओखाली “सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबर कुणीही स्पर्धा करू शकत नाही. सध्या चांगली कॉमेडी फक्त तिथेच होते. ओंकार भोजने तुझे ‘अग्ग अग्ग आई’ या स्किटची आठवण येत आहे. तू त्याच मालिकेत भारी होतास, ‘चला हवा येऊ द्या’मध्ये स्त्रियांच्या भूमिका साकारून जी माती खात होता, तेच इथेही करत आहात, वेगळं काय करताय तुम्ही?, ओंकारला अशा भूमिका अजिबात शोभत नाहीत. हास्यजत्रामध्ये हा तारा होता आणि इथे बल्ब वाटत आहे. यांना स्त्री पात्र होऊनचं काम का करायचे आहे? त्या शिवाय लोकांना हसवू शकतं नाही का? कॉमेडी काही जमत नाही राव यांना. तेच तेच कंटाळवाणे वाटत आहे.”

आणखी वाचा – ‘सैराट’मधील परश्याचे मित्र आता जगत आहेत असं आयुष्य, सध्या नेमकं काय काम करतात?, लूकही बदलला अन्…
तर यापुढे काहींनी असं म्हटलं आहे की, “ओंकार भोजनेचा फुगा फुटला आहे आणि एक कळले की जोपर्यंत पडद्यामागील लेखक चांगली स्क्रीप्ट लिहीत नाही तो पर्यंत पडद्यावर कितीही मातब्बर कलाकार असो, हास्य निर्माण होणारच नाही. ‘चला हवा येऊ द्या’मधील स्त्री पात्र करणारे भाऊ कदम, सागर कारंडे आणि कुशल बद्रिके आधी सुसह्य वाटायचे पण आता भाऊ कदम मात्र चक्क पकाऊ अभिनेता वाटत आहे. निलेश साबळेंनी आत्मपरीक्षण करावे आणि पुन्हा एकदा चांगल्या स्क्रिप्टवर मेहनत घ्यावी.”
तर याउलट काहींनी आमच्या कुटुंबाने खूप एंजॉय केला, मला हा एपिसोड आवडला, कडक झाला हा एपिसोड, कलाकार भारी आहेत, खूप हसलो, मजा आली, खूप छान” अशा कमेंट्सद्वारे या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.