कलाकार हे सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आयुष्यातील अनेक खास प्रसंगे व किस्से शेअर करत असतात आणि कलाकार म्हटलं की कौतुकाबरोबर टीकाही आलीच. काही कलाकार सोशल मीडियावरील नेटकऱ्यांच्या या प्रतिक्रियेकडे किंवा टिकेकडे दुर्लक्ष करतात. पण काही कलाकार मात्र या नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देतात. यांपैकीच एक नाव म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्या नेहमीच सोशल मीडियावरील नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देतात. अभिनेत्रीने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेअर केला. ज्या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे त्यांना काही प्रतिक्रिया आल्या आहेत.
नारकर जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ते एका गाण्यावर डान्स करत आहेत. या व्हिडीओखाली आलेल्या कमेंट्समध्ये अनेकांनी ऐश्वर्या यांचे कौतुक केले आहे. मात्र काहींनी अविनाश यांच्या डान्सवर त्यांची प्रतिक्रिया देत त्यांना डान्स येत नसल्याचे म्हटले आहे. यावर एकाने असं म्हटलं आहे की, “तूम्ही (ऐश्वर्या नारकर) आकर्षकपणे डान्स करता पण काकांची (अविनाश नारकर) यांच्या डान्स स्टेप्स उगाच वाटतात”. यावर ऐश्वर्या यांनी त्याला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “जोपर्यंत ते नृत्याचा आनंद घेत आहेत तोपर्यंत बाकी कशानेही फरक पडत नाही”.
तर आणखी एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “सर तुम्ही याहून चांगले नाचू शकता हे मला माहीत आहे, पण तुम्ही जाणून बुजून असे का नाचता?, ते छान नाही दिसत. २०११ ला मी तुम्हा दोघांना भेटलो होतो तेव्हा तुम्ही एक छान जोडपे होता. पण आता १२ वर्षात काय झाले?” नेटकऱ्याच्या या प्रश्नला उत्तर देत ऐश्वर्या यांनी असं म्हटलं आहे की, “डान्सचा आनंद घेणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. इथे कोणतीही स्पर्धा नाही. तुम्हीही तोच आनंद घ्यावा, धन्यवाद.”


दरम्यान, ऐश्वर्या-अविनाश यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओखाली त्यांना अनेक सकारात्मक प्रतिक्रियाही आल्या आहेत काही चाहत्यांनी “तुम्हा दोघांना पाहून खूप भारी वाटतं, तुम्ही दोघे खूप कमाल आहात, क्या बात है?, नेहमी असेच आनंदी राहा” अशा अनेक कमेंट्स करत त्यांना हा व्हिडीओ आवडल्याचे सांगितले आहे.