मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकाराणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक लोकप्रिय व सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. आपल्या विविधांगी भूमिकांनी चर्चेत असणारा हा अभिनेता सध्या त्याच्या काही वैयक्तिक कारणांनी चर्चेत आला आहे. अभिनेत्याने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत भविष्यात कधीही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नसल्याचे म्हटले आणि यांचे कायारण म्हणजे चिन्मयच्या कुटुंबियांवर सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग.
चिन्मयने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे व्हिडीओ शेअर करत मुलाचं नाव ‘जहांगीर’ ठेवल्यामुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर आपलं मत मांडलं. या व्हिडीओद्वारे चिन्मयने “यापुढे मी कधीही महाराजांची भूमिका करणार नाही” असं म्हटलं. त्यामुळे अभिनेत्याच्या या निर्णयावर त्याच्या अनेक चाहते मंडळींसह मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही नाराजी व्यक्त केली आहे. “हा निर्णय मागे घे”, असं म्हणत अनेक चाहते अभिनेत्याला विनंती करताना दिसत आहेत. तसेच रवी जाधव, समीर विद्वांस, अक्षय वाघमारे, सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर आणि गौतमी व मृण्मयी देशपांडे यांनी चिन्मयच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.


रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे “मी नेहा व चिन्मयच्याबरोबर असून एक भारतीय म्हणून सायबर सेल व महाराष्ट्र सरकारकडे त्याला ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर कडक कारवाई करण्याची विनंती करत आहे. यासह चिन्मयने आपला निर्णय मागे घ्यावा असंही म्हटलं आहे. तर समीर विद्वांसने याबद्दल त्याचं मत व्यक्त करताना असं म्हटलं आहे की, “हे खूप जास्त दुर्दैवी आहे. महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी व त्यांच्या शिकवणीशी काहीही देणंघेणं नाही.” तसेच समीरने या सर्व प्रकरणात चिन्मयसह त्याच्या पत्नी व मुलाला पाठिंबा देत चिन्मयला “एक कलाकार म्हणून ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करत आहेस ती करत राहावी” अशी विनंतीदेखील केली आहे.


याचबरोबर सिद्धार्थने “जहांगीर नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी व त्यांच्या शिकवणीशी काहीही देणंघेणं नाही” असं म्हटलं आहे तर गौतमीने “कलाकारांना सॉफ्ट टार्गेट बनवायचं असेल तर काहीतरी चांगलं मिळण्याची लोकांची लायकी नाही” असं म्हणत तिचा संताप व्यक्त केला आहे. तर सईने “हे खूपच विचित्र व दुर्दैवी आहे आणि मी तुझ्या बाजूने आहे” असं म्हणत चिन्मयला पाठिंबा दिला आहे. यांसह मृण्मयीनेही “अजून किती सहन करायचं?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.