कलाकार व चाहते यांचे कायमच एक वेगळे नातं असतं. प्रत्येक कलाकाराला त्याच्या आवडत्या चाहत्यांकडून कायमच काही नवनवीन प्रतिक्रिया मिळत असतात. प्रत्येक कलाकाराला चाहत्यांचे असे अनुभव हे पदोपदी येतच असतात. असाच एक विलक्षण अनुभव अभिनेता संकर्षण कऱ्हाडेलाही आला आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या कवितांच्या सादरीकरणातूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे आणि त्याच्या याच कवितांच्या व अभिनयाच्या प्रेमात पडलेल्या एका चाहतीचा अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
संकर्षणने त्याच्या सोशल मीडियावर यासंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने “साताऱ्यामध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करत आहे, वेळ असेल तर वाचा” असं म्हणत हा अनुभव सांगितला आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “त्या मॅडमनी म्हणे १२ वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगीतलं की, मला संकर्षणबरोबरच लग्नं करायचं आहे. त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आईने “अभ्यास करा” असं उत्तर दिलं. पुढे त्यांचं शिक्षण झालं, लग्नं झालं असून त्यांना दीड वर्षांचा मुलगा आहे आणि आता त्या सातारामध्ये असतात”.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या. त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला की, बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा आणि आमची भेट झाली आणि त्यांनी मला हे सगळं स्वतः सांगितलं. दीड वर्षांच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेवून अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगुन गेली. हे किती गोड आहे. प्रेक्षक व कलाकार यांच्या अनेक वर्षं एकत्र होणाऱ्या या प्रवासाचंही मला कौतुक वाटलं. त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं या भावनांचंही मला फार फार कौतुक वाटलं. तसेच बाळ झोपलं असेल तर संकर्षणला भेटून ये, बोल. हे म्हणणाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजुतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं.”
यापुढे संकर्षणने त्याच्या पोस्टमध्ये, “माझ्या नावावरुन त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूचं ठेवलं आहे. हे तर काहीच्या काही मस्त वाटलं. प्रेक्षकहो, असंच प्रेम करत राहा. भेटत राहा. मी जबाबदारीने काम करीन.” असं म्हणत त्याने सर्व प्रेक्षकांचे आभार मानत त्यांना धन्यवादही म्हटलं आहे. दरम्यान, संकर्षणची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या पोस्टखाली अनेकांनी त्याचे कौतुकही केले आहे.