सोशल मीडियाच्या या काळात कोणतीही गोष्ट अगदी वाऱ्यासारखी व्हायरल होते आणि त्या व्हायरल गोष्टीचा बघता बघता ट्रेंडदेखील होतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक ट्रेंड सुरु आहे, तो म्हणजे ‘गुलाबी साडी’चा. सोशल मीडियावर मराठी गाणं ‘गुबाली साडी’चा ट्रेंड अगदी जोरात सुरु असून सर्वत्र याचीच चर्चा सुरु आहे. इन्स्टाग्राम सुरु केलं की ‘गुलाबी साडी अन्…’ हेच गाणं बऱ्याच रिल्समध्ये ऐकायला मिळेल. फक्त सर्वसामान्यच नव्हे तर, अगदी बॉलिवूडच्या व मराठीच्या अनेक कलाकारांनाही ‘गुलाबी साडी’ची भुरळ पडली आहे. या गाण्यावर कितीतरी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अशातच सोशल मीडियावर या ट्रेंडसंबंधित एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे अभिनेता गौरव घाटणेकरचा. श्रुती मराठेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात गौरव गुलाबी साडी या गाण्याच्या ओळी चुकीच्या म्हणत आहे. गुलाबी साडी या गाण्याच्या ओळी चुकीच्या गात असताना त्याची झालेली मजेशीर गंमत श्रुतीने या व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. यात तो गुलाबी साडी गाण्याच्या तालावर चुकीच्या ओळी गात असं म्हणतो की, “गुलाबी लाली अन् गाल लाल लाल… कशी मी नाचू तुझी साडी डाल डाल…”
गौरवला या चुकीच्या ओळी गाताना बघून श्रुतीला हसू येते. यापुढे श्रुती हा व्हिडीओ शूट करताना पाहून तो तिच्यावर चिडतो. यानंतर तो त्या गाण्याच्या ओळी ऑनलाइन सर्च करतो आणि पुन्हा चुकीच्या ओळी गातो. यावेळी तो ‘गुलाबी साडी’ऐवजी गुलाबी गाडी असं म्हणतो. त्याला या गाण्याच्या चुकीच्या ओळी गाताना बघून श्रुतीला मात्र खूप हसायला येते आणि आपल्यालादेखील हा व्हिडीओ पाहत असताना तितकेच हसायला येते.
आणखी वाचा – ‘झी नाट्य गौरव २०२४’ सोहळ्यात या नाटकाने पटकावले अनेक पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं…; वाचा संपूर्ण यादी
दरम्यान, श्रुतीने हा व्हिडीओ शेअर करत “असा आत्मविश्वास पाहिजे मला” असं म्हटलं आहे. तसेच तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये गौरवची ‘गुलाबी साडी’ गाणं गातानाची झालेली मजा पाहायला मिळत आहे. तसेच हा गौरव-श्रुतीचा मजेशीर व्हिडीओ चाहत्यांनादेखील तितकाच आवडला आहे. या व्हिडीओखाली हसण्याच्या अनेक कमेंट्स करत त्यांनी या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.