सध्या जिथे तिथे मोमोचे स्टॉल पाहायला मिळतात. फास्टफूडच्या या जगात मोमो लव्हरची संख्याही अधिक असल्याचं पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणचे मोमो हे प्रसिद्ध असून यांत मुंबईतील भायखळा मधील ‘भायखळाची मोमोवाली’ हे नाव आवर्जून घेतलं जाईल. भायखळाची मोमोवाली म्हणून प्रसिद्ध असलेली ही मराठमोळी मुलगी स्वरांगी कॉलेजकुमारी असून तिने लॉकडाऊनच्या दरम्यान सुरु केलेला हा व्यवसाय आजही सुरु आहे. (Bycullachi Momowali)
लॉकडाऊनच्या काळात सुरु केलेला हा व्यवसाय आहे. मात्र त्यानंतर जवळपास ३ वर्ष तिने स्टॉलवर बसून काढलं. काहीच नफा न कमावल्याने हा व्यवसाय आता बंद करायचा की काय असा प्रश्न तिला पडत होता. रस्त्यावर हा स्टॉल सुरु केल्याने अनेकांनी तिला हिणवलं, एवढे शिक्षण घेऊन रस्त्यावर मोमो विकण्याचं का काम करत आहेस?, स्टॉल लावण्याऐवजी शिक्षण घे, नाहीतर एखादा जॉब बघ, असे अनेक प्रश्न समाज वर्गातून विचारण्यात आले. या व्यवसायादरम्यान आलेल्या अडचणींचा लढा तिने पार करत प्रसिद्धी मिळवली. भायखळ्याच्या या मोमोवालीच्या प्रवासाची दखल ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनेलने घेतली आहे.
रस्त्यावर स्टॉल सुरु करुन, एकटीने सेटअप करुन, एकटीने मोमो बनवत ते खाऊ घालणं हे टॅलेंट म्हणावं लागेल. गेली चार वर्ष शिक्षण सांभाळून तिने हा व्यवसाय सुरु ठेवला आहे. लॉकडाऊनमध्ये मोमो कुठे मिळत नव्हते त्यामुळे तिने घरीच मोमो तयार केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यात मोमो विकण्याची कल्पना आली. आणि तिने एक छोटा स्टॉल सुरु केला. आधी सुरुवातीला पनीर, व्हेज आणि नॉनव्हेज मोमो विकायला तिने सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू तिने पनीर टिक्का, चिकन टिक्का, चीझ चिली मोमो बनवायला सुरुवात केली.
सुरवातीला दोन वर्षात दिवसाला दहाएक ग्राहक यायचे. त्यानंतर हळूहळू ग्राहकांची, खवय्यांची संख्या वाढत गेली. त्यांनतर तिला भायखळ्याची मोमोवाली ही टॅगलाईन मिळाली. चव आवडल्यामुळे तिने तिचा व्यवसाय वाढवला. दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे साधारण २० ते ३० प्लेट ती मोमो विकते. कुरकुरे मोमो १७० रुपयाला फुल प्लेट आहेत. तर ९० रुपयाला हाफ प्लेट आहेत. स्टीम मोमो हे १०० रुपये फुल प्लेट तर ६० रुपये हाफ प्लेट आहेत. हा व्यवसाय सुरु केल्यानंतर स्वरांगीच्या घरच्यांनाही अभिमान वाटत आहे. इतकंच नव्हेतर अबोल असणारी ही स्वरांगी या व्यवसायामुळे बोलकी झाली.