२१ वे शतक तंत्रज्ञानाचे आहे असे म्हटले जाते. हे किती खरे आहे हे बदलत्या जगाबरोबर रोज लक्षात येते. २० व्या शतकातील अनेक गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे मानवी जीवनावर याचा खूप मोठा फटका बसला आहे. मात्र सध्याच्या उपकरणांच्या जगात प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंना प्राधान्य देणारा वर्गही आज पाहायला मिळत आहे. म्हणजेच या प्राचीन काळातील वस्तू आजही वापरात आणल्या जातात. केवळ गावा खेड्यातच नव्हेतर शहरातही या प्राचीन वस्तू वापरात आणल्या जातात. सर्वसामान्य रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या या दगडी वस्तू म्हणजेच दगडी जात, पाटा, वरवंटा, खलबत्ता या शहरात कुठे विकत घेऊ शकता याची आज माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. (Traditional Household Items)
जुन्या काळातील या वस्तू दादर येथे मिळत असून या दुकानाची सफर ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनेलवर पाहायला मिळत आहे. दादरच्या नक्षत्र मॉलमध्ये असलेल्या अर्थस सोल या दुकानात प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या गृह उपयोगी वस्तू मिळतात. या दुकानात दगडी दिवे, दगडी जातं, दगडी पाटा वरवंटा, खलबत्ता मिळतात. केवळ दगडी वस्तूच नव्हे तर या ठिकाणी बिड्याच्या वस्तू देखील उपलब्ध आहेत. या बिड्याच्या तव्यांची किंमत ४९५ रु ते ९५० रु. इतकी आहे. साईजनुसार आणि या तव्यांच्या प्रकारानुसार याची किंमत बदलत जाते.
या दुकानाची खासियत म्हणजे खलबत्ता. पारंपरिक पद्धतीचा थेट मद्रासहुन खाणीतून आलेल्या दगडापासून बनवलेल्या खलबत्त्याची प्राइज २०० रु. पासून सुरुवात आहे. यामध्ये ठेचले जाणारे पदार्थ जेवणात वापरल्यास जेवणाची चव द्विगुणीत होते. खलबत्य्यांचे ही येथे वेगवेगळे आकार पाहायला मिळतील. याशिवाय इथे सलगमही उपलब्ध आहे. पाटा, वरवंटा आणि खलबत्ता याचं मिश्रण असलेले हे सलगम आहे. याची सुरुवात ७५० रु. पासून होते. याशिवाय इथे मद्रासी विळीदेखील उपलब्ध आहे. ५५० रु. या विळीची किंमत आहे.
याशिवाय इथे हवे त्या आकाराचे पाटा -वरवंटा उपलब्ध आहेत. मुंबईच्या ठिकाणी जागा कमी असल्याने ओट्यावर उभ्याने वाटण वाटण्यासाठीचा पाटा -वरवंटा येथे उपलब्ध आहे. आकारांनुसार याची किंमत वेगवेगळी आहे. काळाप्रमाणे लुप्त झालेल्या या गृह उद्योग वस्तूंना आजही तितकीच मागणी आहे. अशा जुन्या वस्तूंचे महत्त्व जपणाऱ्या माणसांसाठी दादरच्या या परिसरात दगडी वस्तू उपलब्ध आहेत. अर्थस सोल, दुकान नंबर. ५, सिने नक्षत्र मॉल, रानडे रोड, दादर पश्चिम येथे या पारंपरिक वस्तू उपलब्ध आहेत.