सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूरबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर येत आहे. शेफ कुणाल कपूरने ‘क्रूरते’च्या कारणावरून पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने काल (मंगळवार, २ एप्रिल) रोजी कुणाल कपूरचा घटस्फोट मंजूर केला. कुणालने फॅमिली कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाकडून ती स्वीकारण्यात आली नाही. कोर्टाचे म्हणणे आहे की महिलेचे वर्तन त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्ण नव्हते. नंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि अखेर इथे त्यांना न्याय मिळाला आहे.
२००८ साली कुणालचे एकता कपूरबरोबर लग्न झाले आणि २०१२ मध्ये ते एका मुलाचे पालकदेखील झाले. लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांचे नाते बिघडू लागले. आपल्या याचिकेत कुणालने एकतावर मोठा आरोप केला असून पत्नीने कधीही आपल्या आई-वडिलांचा आदर केला नसल्याचे म्हटले. त्याचबरोबर कुणालच्या पत्नीने नेहमीच त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा छळ केला असल्याचेही याचिकेत म्हटले. त्याचबरोबर ती कुणालकडे सातत्याने पैशांची मागणीदेखील करत असल्याचा आरोप कुणालने केला आहे.
कुणालने असाही आरोप केला आहे की, जेव्हापासून तो लोकप्रिय झाला तेव्हापासून त्याची पत्नी मीडियामध्ये त्याच्याविषयी खोट्या अफवा पसरवत आहे. तसेच कुणाल व त्याच्या पालकांविरुद्ध खोट्या गुन्हेगारी तक्रारी दाखल करण्याची धमकी देत असे. तसेच एकेदिवशी शूटिंगला जाण्यापूर्वी कुणालला त्याच्या पत्नीने कानाखाली मारले असल्याचेही म्हटले आहे. असं असतानाच त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे की, तिने नेहमीच तिच्या पत्नी असण्याची जबाबदारी पार पाडली आहे. ती कायम तिचा पती कुणाल व त्याच्या कुटुंबाशी एकनिष्ठ राहिली आहे. याउलट कुणालने तिच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी मुद्दाम खोट्या बातम्या पसरवल्या आहेत.
यानंतर कुणालच्या बाजूने निकाल देताना न्यायालयाने असे सांगितले की, कुणालविरुद्ध एकही पुरावा खरा सिद्ध होऊ शकत नाही. याउलट खोटे आरोप करून त्याची सार्वजनिक प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि हे खरोखरच क्रूर आहे. यानंतर कोर्टाने शेफच्या बाजूने निकाल दिला. दरम्यान, कुणाल हा एक लोकप्रिय व प्रसिद्ध शेफ आहे. लहानपणापासूनच त्याला स्वयंपाकाची खूप आवड होती. त्यामुळे त्यांनी पाककलेतच त्याने आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्याला ‘मास्टर शेफ इंडिया’चे परीक्षक म्हणूनही ओळखले जाते.