‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका साऱ्यांच्याच पसंतीस पडत आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर आहे. या मालिकेतून नकारात्मक पात्र साकारणाऱ्या ऐश्वर्या नारकर म्हणजेच रूपाली म्हात्रे या पात्राला तर प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. या पात्राचा प्रेक्षक जितका तिरस्कार करतात तितकाच त्या पात्राची भूमिका साकारणाऱ्या ऐश्वर्या यांच्यावर प्रेमही करतात. (Aishwarya Narkar On Negative Comment)
ऐश्वर्या नारकर यांनी आजवर सकारात्मक भूमिका साकारल्या असल्या तरी या मालिकेतील त्यांची नकारात्मक भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. रूपाली या पात्राला त्या योग्य तो न्याय देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या यांना सोशल मीडियावरुन बरेचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. या ट्रोलिंगला त्या न जुमानता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना त्या दिसल्या आहेत.
नुकतेच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे ५०० एपिसोड पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने ऐश्वर्या नारकर यांनी ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी रूपाली ही भूमिका साकारताना सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. रुपाली या भूमिका साकारत असताना आलेल्या प्रतिक्रियांबद्दल बोलताना ऐश्वर्या म्हणाल्या, “जेव्हा मालिका सुरु झाली, तेव्हा रुपाली म्हात्रे हे पात्र नकारात्मक असून ते इतर पात्रांना छळत असल्याचं समोर आलं तेव्हा मला सोशल मीडियावर खूपच वाईट प्रतिक्रया येत होत्या. साधं कॉफीवालं रील जरी टाकलं तर वेगळ्याच प्रतिक्रिया यायच्या. ‘काय आहे या नारकर कपलचं’, ‘ही मरत का नाही आहे?’, ‘हिचा ऍक्सिडंट का होत नाही आहे?’, अशा कमेंट येऊ लागल्या. तेव्हा मला कळायला मार्गच नव्हता की अचानक अशा वाईट प्रतिक्रिया का येत असतील”.
पुढे त्या म्हणाल्या, “मग मला असं वाटलं की, कदाचित प्रेक्षक टेलिव्हिजनवरील त्या पात्राला रिलेट करत या प्रतिक्रिया देत असतील. मी ऐश्वर्या आहे हे विसरुन ते रुपाली म्हात्रे म्हणून मला पाहू लागले. त्या कमेंट पाहून हे कळत होतं की, प्रेक्षकांच्या डोक्यात त्या पात्राबद्दल किती राग आहे. मला ही कुठेतरी कामाची पोचपावती वाटते. हे त्रासदायकही आहे”.