साऊथ सिनेसृष्टीतून एकामागोमाग एक वाईट बातम्या कानावर पडत आहेत. अशातच पुन्हा एकदा वाईट बातमी समोर आली आहे. तामिळ व मल्याळम चित्रपटांमध्ये अभिनयाची जादू निर्माण करणारे सुप्रसिद्ध अभिनेते डॅनियल बालाजी यांचं निधन झालं आहे. या अभिनेत्याचे शुक्रवारी २९ मार्च रोजी वयाच्या ४८व्या वर्षी निधन झाले. डॅनियल बालाजी या नावाने प्रसिद्ध असलेले टीसी बालाजी यांच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांनाच नव्हे तर इंडस्ट्रीलाही मोठा धक्का बसला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अचानक छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना चेन्नईतील कोटिवाकम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान अभिनेत्याचा मृत्यू झाला. (Daniel Balaji Death)
डॅनियल बालाजी यांच्या पार्थिवावर आज पुरसाईवलकम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या निधनाने डॅनियल यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दिग्दर्शक मोहन राजा यांनी अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. “खूप दु:खद बातमी. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सामील होण्यासाठी तो माझ्यासाठी प्रेरणास्थान होता. एक चांगला मित्र. त्याच्याबरोबर केलेलं काम माझ्या नेहमीच आठवणीत राहील. त्याच्या आत्म्याला शांती मिळो”, असं त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले.
डॅनियल बालाजी बऱ्याच काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. जवळपास तीन दशकांपासून ते चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कमल हासनच्या ‘मरुधनायागम’ या चित्रपटातून केली, मात्र तो चित्रपट कधीही प्रदर्शित झाला नाही. पहिला चित्रपट प्रदर्शित होऊ न शकल्यानंतर डॅनियल टीव्हीकडे वळले आणि ‘चिठी’ या मालिकेतून त्यांनी नाव कमावले. या मालिकेनंतर त्याचे नाव डॅनियल ठेवण्यात आले.
डॅनियलच्या दुसरी मालिका ‘अलैगल’चे दिग्दर्शक सुंदर के विजयन यांनी त्यांना त्यांचे नाव बदलून डॅनियल ठेवण्यास सुचवले होते, कारण ‘चिठी’मधील त्याचे पात्र त्याला अनुकूल होते. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने कमल हासन, थलपथी विजय आणि सुरिया यांसारख्या अभिनेत्यांबरोबर ‘एप्रिल मधाथिल’, ‘काखा काखा’ आणि ‘वेट्टैयाडू विलायाडू’सह अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.