अभिनेत्री मीना कुमारीला ट्रॅजेडी क्वीन असंही म्हटलं जातं. ३९ वर्षांच्या आयुष्यात अभिनेत्रीने बरंच काही सहन केले. अभिनेत्रीच्या आयुष्यात जन्मापासूनच दुःखाला सुरुवात झाली. मीना कुमारीचा जन्म झाला तेव्हा तिच्या वडिलांकडे डॉक्टरांना पैसे देण्याइतकेही पैसे नव्हते. म्हणून त्यांनी मीनाला तिथेच सोडले. मात्र त्यानंतर काही तासांनी लक्षात येताच त्यांनी मीनाला परत आणले. मीनाला उचलायला ते परत गेले तेव्हा तिच्या अंगावर मुंग्या चालत होत्या. (Meena Kumari Lifestyle)
मीनाच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे तर, ती निर्माते कमाल अमरोही यांच्या प्रेमात होती. अशोक कुमार यांनी मीना कुमारी यांची कमल अमरोही यांच्याशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर कमलने मीनाला एका चित्रपटात रोल ऑफर केला. पण चित्रपट फ्लोरवर जाण्याआधीच मीनाचा भीषण अपघात झाला आणि उपचारासाठी त्यांना बराच काळ रुग्णालयात राहावे लागले. त्यादरम्यान अभिनेत्री बरीच डिप्रेशनमध्ये गेली होती. कमल रोज तिला भेटायला यायचे. मीना जवळपास ४ महिने हॉस्पिटलमध्ये राहिली. त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि १४ फेब्रुवारी १९५२ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यावेळी कमल विवाहित होते आणि ३ मुलांचे वडील होते.
कमलबरोबर लग्न केल्यानंतर मीनाच्या आयुष्यात अनेक अडचणी सुरु झाल्या. कमल मीनावर बंधने घालू लागले, ते मीनाला ६.३० वाजता घरी यायला सांगायचे. तिच्या मेकअप रुममध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. कमलने पाठवलेल्या गाड्यांमध्येच ती प्रवास करु शकत होती. अनेक बंधनांमुळे मीना डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर १९६४ मध्ये मीना व कमल यांचा घटस्फोट झाला.
मीनाला हा घटस्फोट सहन झाला नाही आणि ती पूर्णपणे खचली. यानंतर मीनाने दारुच्या नशेत स्वत:ला ओढले. तिने खूप दारु प्यायला सुरुवात केली. १९६८ मध्ये मीनाची प्रकृती बिघडू लागली आणि डॉक्टरांनी त्यांना काम न करण्याचा सल्ला दिला. पण मीनाने अभिनय सुरुच ठेवला. त्यानंतर तिची तब्येत बरीच खालावत गेली तेव्हा काही काळासाठी अभिनेत्रीने दारु सोडली. त्यामुळे तिची तब्येत थोडी सुधारली. मात्र कालांतराने अभिनेत्रीची तब्येत खालावत गेली आणि त्यांना नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. दोन दिवस कोमात राहिल्यानंतर ३१ मार्च १९७२ रोजी वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीनाने तिच्या शेवटच्या दिवसांत गरिबी पाहिली होती.