प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता झाल्यापसून चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. गेले काही दिवस त्याच्या नावाच्या चांगल्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. आज या कारणामुळे तर उद्या त्या कारणामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा या सतत सुरुच असतात. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर, यूट्यूबरशी भांडण केल्याबद्दल त्याच्याबद्दल सोशल मीडियासह याने माध्यमांत चर्चा होताना पाहायला मिळत आहेत.
अशातच नुकतेच एल्विशने मुनव्वर फारुकीला मिठी मारली होती, ज्यामुळे तो त्याच्या चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे. एल्विशने नुकतीच मुनव्वरची भेट घेतली. यावेळी त्याने मुनव्वरला मिठी मारल्यामुळे एल्विशच्या अनेक चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हे प्रकरण इतके वाढले की, एल्विशला कॅमेऱ्यासमोर येऊन हात जोडून त्याच्या चाहत्यांची माफी मागावी लागली. एल्विशने त्याच्या यूट्यूब चॅनलवर व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो हात जोडून चाहत्यांची माफी मागताना दिसत आहे.
यावेळी त्याने असं म्हटलं की, “जेव्हापासून मुनव्वर फारुकीबरोबर माझा फोटो व्हायरल झाला आहे, तेव्हापासून माझ्या खऱ्या हिंदू असण्यावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. इतकेच नव्हे तर मला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळत आहेत. त्यामुळे या व्हिडीओद्वारे मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. माझ्या सनातन धर्मासाठी एक नव्हे, तर असे हजारो मुनव्वर फारुकींचे कुर्बान आहेत. मी त्याला माझा कुणी मित्र किंवा भाऊ वगैरे मानत नाही. माझ्यासाठी माझा धर्म महत्त्वाचा आहे”.
दरम्यान, बॉलीवूड आणि क्रिकेट सेलिब्रिटींच्या अलीकडेच झालेल्या ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’मध्ये एल्विश व मुनव्वर यांनीही सहभाग घेतला होता. या खेळादरम्यान दोघांचे एकत्र अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले होते. यानंतर, एल्विश खरा हिंदू असल्याबद्दल त्याच्या चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर एल्विशने एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे.