बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांमुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक विशेष ओळख प्राप्त झाली. सध्या ते ८१ वर्षांचे असून त्यांचा फिटनेस वाखाण्याजोगा आहे. पण नुकतीच यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याच्या बातम्या समोर आल्या. या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या चाहत्यांनी ते लवकर बरे व्हावेत अशा प्रार्थनाही केल्या आहेत. (Amitabh bachchan health update)
आता त्यांच्या तब्येतीबद्दल एक अपडेट समोर येत आहे. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच त्यांची तब्येतही स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. शुक्रवारी सकाळी त्यांना कोकिलाबेन रुग्णालायत दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. तेथेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेची माहिती समोर आल्यानंतर सगळे जण घाबरले पण शस्त्रक्रिया त्यांच्या हृदयावर झाली नसून पायामध्ये क्लॉट असल्याने पायाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
त्यांच्या जवळच्या व्यक्तीने एका माध्यमाला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, “अमिताभ यांना शुक्रवारी सकाळी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी झाली आणि आता त्यांना घरीदेखील आणण्यात आले आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणाही होत आहे”. अमिताभ यांनी काही तासांपूर्वी ‘कृतज्ञतापूर्वक कभी…’ असे ट्विट केले होते. यावर अनेक नेटकाऱ्यांनी त्यावर काळजी दाखवत प्रतिक्रियाही केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला की, “तुम्ही व्यवस्थित रहाल अशी मी प्रार्थना करतो”, दुसरा नेटकरी लिहितो की, “तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा!”.
अमिताभ यांच्या अचानक समोर आलेल्या वृताने मनोरंजन क्षेत्रातून चिंता व्यक्त केली गेली आहे. ते लवकरात लवकर बरे होऊन त्यांनी काम सुरू करावे असेही अनेकांनी म्हंटले आहे. काही दिवसांपूर्वी ते अनंत अंबानी व राधिक मर्चंट त्यांच्या प्री-वेडिंगमध्ये कुटुंबासमवेत दिसून आले होते. आता ते कल्की २८९८ –AD या चित्रपटात दिसणार असून चाहते त्यांच्या चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.