मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजण करणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी. विनोदी, गंभीर तसेच नकारात्मक भूमिकांद्वारे त्यांनी मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. तसेच त्यांनी अनेक रियालिटी माध्यमांद्वारेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र अभिनेते गेले अनेक दिवस एका गंभीर आजाराशी झुंज देत होते आणि हा एक असा आजार होता, ज्यावर औषधही उपलब्ध नाहीत.
स्वत: विद्याधार जोशींनी त्यांच्या या गंभीर आजारबद्दल खुलासा केला आहे. सौमित्र पोटे यांच्या ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला आहे. फुप्फुसाशी संबंधित असलेला Interstitial lung disease (ILD) आजार झाल्यानंतर ते फुप्फुस प्रत्यारोपण दरम्यानचा अनुभव या मुलाखतीत विद्याधर जोशींनी सांगितला आहे.
विद्याधर यांनी त्यांच्या या आजारपणाबद्दल सांगताना असं म्हटलं की, “मला जिने चढतानादेखील त्रास व्हायचा. तीन मजले चढलो तरीदेखील मला मोठी धाप लागायची. तसेच धावून शांत होईपर्यंतचा काळदेखील वाढत असल्याचे मला जाणवायला लागले. तसेच मला १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा कोविड झाला. कोविडमधून बरा झाल्यानंतर खूप त्रास झाला. सतत ताप येऊ लागला, मग डॉक्टरकडून उपचार सुरू केले. नेमकं काय झालं असावं हे पाहण्यासाठी मी सीटी स्कॅन केले. त्यावेळी फुप्फुसावर जखमा दिसल्या. तेव्हा हे सगळं कोविडमुळे असावे असे वाटत होते. पण, एका डॉक्टरने ही जखम दुसरीच कसली तरी असल्याचे सांगितले”.
यापुढे ते असं म्हणाले की, “त्यानंतर आम्ही काही वैद्यकीय चाचण्या केल्या तेव्हा डॉक्टरांनी मला फुप्फुसातील फायब्रॉसिस झाला आहे असं सांगितले. त्यातही मला Interstitial lung disease (ILD) या प्रकारातील आजार झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावर त्यांनी हा आजार कठीण असल्याचेदेखील म्हटले. मात्र कॅन्सर किंवा इतर तत्सम जसे औषध असतात किंवा या आजारांवर औषध घेऊन हे आजार बरेही होतात. मात्र मला झालेल्या आजारावर काहीच औषध नसल्याचे मला डॉक्टरांनी सांगितले. तसेच हा आजार थांबवता येत नाही, कसा होतो याची कल्पनाही नाही. तसेच यावर काहीच उपाय नसल्याचे कळले तेव्हा मात्र आम्ही दोघे जण घाबरलो होतो”.
यापुढे त्यांनी “या गंभीर आजारामुळे माझे फुप्फुस १३ टक्के निकामी झाले. मग ६ नोव्हेंबरला माझे फुप्फुस १४ टक्के निकामी झाले. याचे प्रमाण महिनाभरात वाढले आणि मग माझं फुफ्फुस ४३ टक्के निकामी झाल्याचे समोर आले. एका महिन्यात एवढा आजार बळावेल असं वाटले नव्हते” असेही सांगितले. दरम्यान, ‘जीवाची होतेय काहिली’ या मालिकेतून त्यांनी अचानक एक्झिट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. बाप्पा जोशी नेमके कुठे गेले?, त्यांनी मालिका का सोडली? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू होती आणि याची उत्तरे या मुलाखतीतून मिळाली आहेत.