बॉलिवूडमधील ‘सीता और गीता’ हा चित्रपट आजही सर्वांच्या लक्षात आहे. या चित्रपटातील हेमा मालिनीच्या दुहेरी भूमिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन झाले होते. याबरोबरच लक्षात राहिलेली भूमिका म्हणजे ‘कौशल्य चाची’ यांची भूमिकाही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ही भूमिका करणाऱ्या मनोरमा या चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्ती आहेत. ‘सीता और गीता’ या चित्रपटामध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका केली होती. त्यांचा अभिनय व हावभाव यामुळे प्रेक्षकांची मने जिंकत असत. तब्बल ६० वर्षे त्यांनी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं. (actress manorama life)
मनोरमा यांचा जन्म लाहोर येथे १९२६ साली झाला. त्यांचे खरं नाव एरिन आयजॅक डॅनियल आहे. त्यांचे वडील भारतीय ख्रिश्चन होते तर आई आयरीश होत्या. मनोरमा यांचे शालेय शिक्षण लाहोरमध्येच पूर्ण झाले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी गायन व नृत्याचेही धडे घेतले. त्यानंतर १९४१ साली त्यांनी ‘खजांची’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर भारत व पाकिस्तान फाळणीनंतर त्या मुंबई येथे स्थायिक झाल्या. त्यांना या चित्रपटसृष्टीमध्ये येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यानानंतर त्यांनी ‘घर की इज्जत’ या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांच्या बहिणीची भूमिका केली. त्यानंतर त्यांनी राजन हस्सर या अभिनेत्याबरोबर लग्न केले. राजन यांनी नन्यत्र निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले आणि मनोरमा यांनी अभिनय क्षेत्रात काम सुरू ठेवले.

त्यांनी आतापर्यंत १६० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण वयानुसार त्यांचे वजन वाढल्याने त्यांच्या वाट्याला सहाय्यक अभिनेत्री किंवा नकारात्मक भूमिका मिळू लागल्या. त्यांनी विविध भूमिका साकारल्या आणि त्या सर्व भूमिकाना प्रेक्षकांनी प्रेमही दिले. चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी लहान पडदयावर काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘दस्तक’ या हिंदी मालिकेमध्ये काम केले. या मालिकेमध्ये त्यांच्याबरोबर शाहरुख खानदेखील होता. त्यानंतर त्यांनी ‘कश्ती’, ‘कुंडली’ व ‘कुटुंब’ या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. त्यांनी ‘वाटर’ या चित्रपटांमध्ये शेवटची भूमिका केली होती. या चित्रपटातील ‘मधुमती’ या भूमिकेला अधिक पसंत केले.
व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करत असताना मात्र त्यांच्या खासगी आयुष्यामध्ये चढ-उतार येत होते. लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांनी आपल्या पतीबरोबर घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगीही आहे. लग्नानंतर मुलगी परदेशात स्थायिक झाली. त्यामुळे शेवटच्या दिवसांत त्या एकट्या पडल्या. २००७ मध्ये त्यांना स्ट्रोक अटॅक आला आणि त्यामुळे त्यांचा पूर्ण चेहरा बिगडला. त्यांना बोलताना अडचणी येत होत्या. शेवटी १५ फेब्रुवारी २००८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.