बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचा माजी पती आदिल खान दुर्रानी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. ३ मार्च २०२४ रोजी त्याने ‘बिग बॉस’ फेम सोमी खानशी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी शेअर केलेल्या लग्नाच्या फोटोंनी साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आदिल व सोमी यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर सोमी व आदिल एकत्र खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळालं. लग्नानंतर हे जोडपं विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत. लग्नानंतरच्या सुखी संसाराची झलक या जोडीने त्याच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसह शेअर केली आहे. आदिल व सोमी लग्नानंतर प्राणीसंग्रहालयात फिरायला गेले होते. येथून त्यांनी सिंहाचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. (Adil Khan Wedding)
लग्नानंतर सोमी तिच्या सासरच्या घरी खूप आनंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. आदिलने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सोमीने केसात गजरा माळलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आदिल म्हणत आहे की, “आमच्याकडे झाडे आहेत. अम्मीने स्वतःच्या हातांनी सोमीसाठी गजरा बनवला आहे. गजरा माळल्यानंतर सोमीला खूप आनंद होतो”. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये सोमी कॉटन कँडी खाताना दिसत आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. सोमीच्या हातात लाल चुडाही पाहायला मिळत आहे.

आदिल व सोमीबद्दल बोलायचे झाले तर, दोघेही एका अवॉर्ड शोमध्ये भेटले होते आणि महिनाभरानंतर दोघांनी लग्न केले. त्यांचा विवाह एका खाजगी समारंभानुसार पार पडला. आदिल व राखीबद्दल बोलताना सोमी म्हणाली होती, “मला माहित आहे की आदिलला खूप त्रास झाला आहे. आता आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. मला मागे वळून बघायचे नाही. मला फक्त भविष्याकडे पाहायचे आहे”.

सोमीच्या आधी आदिलने राखी सावंतसह लग्न केले होते. राखीमुळे आदिल विशेष चर्चेत आला होता. राखीचे हे लग्न वादग्रस्त राहिले. राखीने आदिलवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेले पाहायला मिळाले. घरगुती हिंसाचाराच्या आरोपामुळे आदिलला तुरुंगातही जावे लागले. जेव्हा राखीला आदिल व सोमीच्या लग्नाची माहिती मिळाली तेव्हा तिने सोमीला कोणीतरी वाचवा, असं म्हटलं. आदिलने यापूर्वी ५-६ लग्ने केली आहेत, असा दावाही तिने केला आहे.