बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या नवनवीन व असामान्य व्हिडीओमुळे नेहमीच चर्चेत असते. तर राखी सावंतचा माजी पती आदिल खान दुर्रानी देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बरेचदा राखी आदिलवर व आदिल राखीवर आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. अशातच आता पुन्हा एकदा आदिल खान दुर्रानी एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. आदिल त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदिल खानने ‘बिग बॉस १२’ ची स्पर्धक सोमी खानसह गुपचूप लग्न केले आहे. (Adil Khan Durrani Wife)
‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, आदिल खानने जयपूरमध्ये सोमीबरोबर विवाहसोहळा उरकला. सोमी खानबद्दल सांगायचे झाले तर, सोमी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे आणि ती ‘बिग बॉस १२’ची स्पर्धक देखील आहे. तिने ‘न्याय: द जस्टिस’, ‘केसरिया बालम’ आणि ‘हमारा हिंदुस्तान’सह अनेक शोमध्ये काम केले आहे. सोमी खान ही सबा खानची बहीण आहे. सोमी तिची बहीण सबाबरोबर ‘बिग बॉस १२’मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. सोमीचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.
‘न्यूज१८’च्या रिपोर्टनुसार, आता आदिल खान दुर्रानी याने त्याच्या व सोमी खानच्या लग्नाबाबत मौन सोडले आहे. सोनीबरोबरच्या लग्नाबाबत तो म्हणाला की, “हे माझं पहिलं लग्न आहे. सध्या आम्ही बेंगळुरूमध्ये आहोत. आम्ही लवकरच दोघेही मुंबईला रवाना होणार आहेत. मी लवकरच सर्व काही माहिती देईन”, असं तो म्हणाला. आदिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. लग्नासाठी आदिल व सोमी यांचा पारंपरिक लूक पाहायला मिळत आहे. शिवाय लग्न रजिस्टर केल्यांनतर त्याचे कागदपत्रे हातात धरत दोघांनी त्यांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – ‘बाईपण…’ नंतर ‘आईपण…’ ठरणार भारी! केदार शिंदे यांची मोठी घोषणा
आदिलने त्याच्या लग्नाचे फोटो शेअर करत ३ मार्च २०२४ रोजी लग्न झाले असल्याचे आणि आता दोघेही पती-पत्नी असल्याचे म्हटले आहे. यावर अखेर राखी सावंतने आरोप करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘टेली टॉक इंडिया’शी बोलताना राखी सावंतने आदिलच्या या लग्नावर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “हे धक्कादायक आहे, त्याने अजून मला घटस्फोट दिलेला नाही. आदिलने माझ्या आधी ५ ते ६ वेळा लग्न केले होते, त्या मुलींनीही घटस्फोट घेतला नव्हता, त्या सर्व अत्याचारानंतर पळून गेल्या आणि सर्वांनी माझ्याशी संपर्क साधला”.