थंडीच्या दिवसात त्वचेच्या समस्या अधिक जाणवतात. मुख्यत्वे हवेत ओलावा नसल्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो. बरेचदा बाहेर फिरायला गेल्यावर हा त्रास आणखी वाढतो. कारण प्रत्येक ठिकाणी हवा व पाणी वेगवेगळी असते, त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्यामुळे हिवाळ्यात केवळ चेहराच नाही तर संपूर्ण शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी महागड्या क्रिमचा वापर करत असाल, तर अभिनेत्री मीरा कपूरचा घरगुती उपाय अवश्य वापरुन पाहा. मीराने भूतानला सुट्टी घालवल्यानंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले की, प्रवासादरम्यान तिची त्वचा खूप कोरडी झाली होती. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तिने कच्चे दूध वापरले. तिच्या मते त्वचेसाठी कच्च्या दुधापेक्षा चांगले दुसरे काही नाही. पण हा घरगुती उपाय खरंच कामी येतो का? जाणून घेऊया याबाबत तज्ञांचे काय मत आहे. (Mira Rajput Kapoor skin care)
डॉ. श्रद्धा देशपांडे या वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रलच्या सौंदर्यशास्त्र, प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक सर्जन आहेत. यांनी एका ऑनलाइन न्यूज पोर्टलला मुलाखत दिली तेव्हा सांगितले की, कच्चे दूध त्वचेच्या कोरडेपणावर एक उत्कृष्ट उपाय आहे. व्हिटॅमिन ए, डी व ईने समृद्ध कच्चे दूध केवळ त्वचेला हायड्रेट करत नाही, तर ते त्वचेला कोमल व मुलायम बनवते. डॉ.देशपांडे पुढे म्हणाल्या की, यामध्ये असलेल्या लॅक्टिक ॲसिडच्या मदतीने त्वचा सुधारते आणि ओलावा शोषून घेण्याची क्षमताही वाढते.
कच्चे दूध हे नैसर्गिकरित्या फारच उपयुक्त आहे. यात ओमेगा ३ फॅटी ॲसिड व उच्च चरबीयुक्त घटक असतात, जे त्वचेला केवळ पोषण नाही तर हायड्रेटही ठेवतात. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो आणि त्वचा लवचिक होण्यापासून वाचते. ‘द एस्थेटिक क्लिनिकच्या कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट आणि कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांच्या मते, कच्च्या दुधात आढळणारे लॅक्टिक ॲसिड हे उत्तम एक्सफोलिएटर आहे. हे मृत त्वचेच्या पेशी काढत त्वचा गुळगुळीत करते.

कच्च्या दुधाचा क्लिंझर म्हणून वापर करु शकता, असे डॉ.देशपांडे यांनी सांगितले. चेहऱ्यावरील तेल, ब्लॅकहेड्स काढून टाकत त्वचा स्वच्छ व गुळगुळीत करते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला कच्च्या दुधाने नियमित मसाज करत असाल तर तुमची त्वचा स्वच्छ व चमकदार होईल. त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि त्वचेला चांगला वास येण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधात गुलाबपाणी वापरू शकता. त्वचा तेलकट असेल तर गुलाबपाणीचे प्रमाण वाढवा. रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे आणि सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याने धुवावे, असे अनेक तज्ञांनी सुचवले आहे. असे केल्यास निर्जीव व कोरड्या त्वचेपासून तुमची सुटका होईल.