‘सारेगमप लिटल चॅम्प्स’ या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. या लोकप्रिय गायनाच्या कार्यक्रमातून मुग्धाने तिच्या सुमधुर स्वरांनी साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मुग्धाच्या गायनाचे लाखो दिवाने चाहते आहेत. मुग्धा तिच्या चाहत्यांसाठी बरेचदा गायनसेवा करताना दिसतात. गायनाचे विविध कार्यक्रम करत ती नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकते. सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही मुग्धाचे गायनासाठीचे दौरे वाढलेले पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर मुग्धा नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीचे अपडेट ती चाहत्यांसह शेअर करताना दिसते. (Mugdha Vaishampayan Story)
अशातच सध्या मुग्धा अंदमान येथे गेली असल्याचं तिच्या पोस्टवरून समोर आलं आहे. अंदमान येथे गायन सेवेसाठी गेलेल्या मुग्धाने शेअर केलेल्या एका पोस्टाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. याआधीही बऱ्याच दिवसांपासून ती अंदमानला गायन सेवेसाठी येत- जात होती. मात्र या वेळेची तिची ही अंदमानची ट्रिप काही खास असल्याचं समोर आलं आहे.

मुग्धाने उकडीच्या मोदकांचा एक फोटो सोशल मीडियावरून शेअर करत, “काल थेट अंदमानात उकडीचे मोदक खाऊन संकष्टी चतुर्थी उपवास सोडला. गेले २ वर्ष मी अंदमानला येत आहे. अंदमानला फार कमी मराठी लोकं राहतात. इथे तमिळ व बंगाली लोकांची संख्या जास्त आहे. पण काल आमच्या कार्यक्रमाला हवाई दलातले अधिकारी श्री. चेतन बागवे आले होते. ते मूळचे महाराष्ट्रातील आणि त्यातही आपल्या कोकणातील म्हणजे सिंधुदुर्गातीलआहेत. त्यांनी मला व पार्थला मोदक खायला घरी बोलवलं होतं. अंदमानात येऊन संकष्टी उपवास सोडण्यासाठी उकडीचा मोदक मिळणं. अजून काय हवं. उकडीचा मोदक बघून विरघळून गेले, मस्त हाणले. या नादात इन्स्ट्राग्रामवर स्टोरी पोस्ट करायची राहिली होती, म्हणून आता केली” असं म्हटलं.
काही दिवसांपूर्वीच मुग्धा गायक प्रथमेश लघाटेसह लग्नबंधनात अडकली. शाही विवाहसोहळा संपन्न करत दोघांनी लगीनगाठ बांधली. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय, कलाकार मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांचा हा थाटामाटात विवाह समारंभ उरकला. मुग्धाच्या व प्रथमेशच्या लग्नाच्या व लग्नापूर्वीच्या विधींच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. लग्नानंतर ही जोडी लगेचच कामाला लागली आहे. दोघेही कोणताच ब्रेक न घेता गायनसेवा करण्यात मग्न झालेले पाहायला मिळत आहेत आणि याचे अपडेट ते त्यांच्या सोशल मीडियावरून नेहमीच देत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुग्धा व प्रथमेश दोघेही उत्तरप्रदेश येथे गायनसेवा करण्यासाठी गेले होते. तसेच नुकतीच दोघांनी जोडीने गाणगापुर येथील दत्तमंदिरात गायनसेवा केली. याचे काही खास फोटो दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते.