Rituraj Singh Death : अभिनेता ऋतुराज सिंह यांच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. २० फेब्रुवारी, मंगळवार रोजी वयाच्या ५९व्या वर्षी निधन झाले. छोट्या पडद्यावरील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी तसेच चाहते शोक व्यक्त करताना दिसत आहेत. तर अनेकजण ऋतुराज यांच्याबरोबर काम करतानाच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
दरम्यान ऋतुराज यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील फोटोही चर्चेत आले आहेत. यांतील ऋतुराज यांचा शाहरुख खान बरोबरचा फोटो विशेष चर्चेत आला आहे. ऋतुराज व शाहरुख त्यांच्या थिएटरच्या दिवसात मित्र होते. दोघेही बॅरी जॉन्स थिएटर ॲक्शन ग्रुप (TAG)चा एक भाग होते. समोर आलेल्या फोटोंमध्ये ऋतुराज व शाहरुख एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. ऋतुराज व शाहरुख यांचा हा बालपणीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऋतुराज यांनी शाहरुख व त्यांच्या मैत्रीबद्दलच्या अनेक आठवणी बऱ्याच मुलाखतींद्वारे सांगितल्या. ऋतुराज यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुखबरोबरच्या मैत्रीविषयी भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना ऋतुराज म्हणाले होते की, “त्यावेळी बेरी जॉनकडे अभिनय शिकताना आम्ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर चर्चा करायचो. आम्ही एकत्रच सराव करायचो, फुटबॉल खेळायचो. आम्हा दोघांची अंगकाठीही एकसारखीच असल्याने आम्हाला एकमेकांचे कपडेदेखील व्हायचे. तो काळ माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ होता. मी शाहरुखच्याच आग्रहाखातर मुंबईत काम शोधायला आलो.”
पुढे ऋतुराज सिंह असेही म्हणाले, “शाहरुख जेव्हा जेव्हा मला भेटायचा तेव्हा मला म्हणायचा, की तू दिल्लीत काय करतोयस? तू इतका उमदा कलाकार आहेस, तुला मुंबईत यायला पाहिजे.” ऋतुराज यांनी शाहरुखचा सल्ला ऐकून मुंबईत काम मिळवलं. त्यांनी मुंबईत येऊन मालिकाविश्वात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. ऋतुराज यांनी ‘हिटलर दीदी’, ‘ज्योती’, ‘शपथ’, ‘अदालत’, ‘आहट’, ‘दिया और बाती’, वॉरियर हाय’, ‘लाडो २’ यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.