छोट्या पडद्यावरील ‘देवों के देव महादेव’ या मालिकेमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सोनारिका भदोरिया. ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत सोनारिकाने पार्वतीची भूमिका साकारली होती. मालिकेतील तिची पार्वतीची भूमिका चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय होती. अशातच पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. सोनारिका भदोरिया नुकतीच विकास पाराशरबरोबर लग्नबंधनात अडकली असून त्यांच्या लग्नाचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
सोनारिका व विकास यांचा राजस्थानमधील रणथंबोर येथील एका हॉटेलमध्ये भव्य विवाहसोहळा पर पडला. त्यांच्या लग्नातील मेहंदी व हळदीचे समारंभही याच ठिकाणी पार पडले. जवळचे काही कुटुंबीय व काही खास मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत या जोडप्याने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. सोनारिकाने लग्नात लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता तर विकासने ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली होती.
तसेच सोनारिकाने त्यांच्या लग्नाचे काही फोटोदेखील शेअर केले आहेत. ज्यामध्ये सोनारिकाने लाल रंगाचा लेहेंगा आणि त्यावर साजेशी ओढणी परिधान केली आहे. तसेच हिरव्या रंगाचा मखमली टॉपही तिने परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. तर विकासनेही मेहंदी रंगाचा भरजरी कुर्ता-पायजमा परिधान केला आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय सुंदर दिसत आहेत.
दरम्यान, सोनारिका व विकास यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत त्यांच्या लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी त्यांच्या या खास लूकचेही कौतुक केले आहे. सोनारिका व विकास यांची पहिली भेट जिममध्ये झाली होती. यानंतर त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सात वर्षे एकमेकांना डेट करत अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.