दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीला खूप मोठा धक्का बसला. अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकून साऱ्यांनी शोककळा व्यक्त केली. मृत्यूच्या वेळी रवींद्र महाजनी हे कुटुंबियांपासून दूर एकटे राहत होते त्यामुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी व त्यांच्या बायकोला नेटकऱ्यांनी बरंच ट्रोल केलं. बरेचदा गश्मीरनर या ट्रोलिंगला सडेतोड उत्तरही दिलेलं पाहायला मिळालं. यानंतर रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या नव्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. (Ranjana And Ravindra Mahajani Incident)
अभिनेते रवींद्र महाजनी आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांच्या अभिनयाने त्यांनी चाहत्यांची मन जिंकली, त्याचबरोबर रवींद्र महाजनी व रंजना देशमुख यांची बऱ्याच चित्रपटांमधील जोडीही हिट ठरली. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले चढ-उतार त्यांनी या पुस्तकरुपी सांगितले आहेत.
या पुस्तकात त्यांनी रवींद्र व रंजना यांच्याबाबत एक किस्सा सांगितला आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की, “रंजना व रवीला एकत्र पिक्चर्स मिळू लागले. त्यांची जोडी हिट ठरली होती. तेव्हा रंजनाने एकदा रवीला सुचवले की, आपल्या दोघांनाच सर्वांत जास्त चित्रपट मिळावेत म्हणून मधुला विश्वासात घेऊन आपण आपले अफेअर चालले आहे असे उठवूया. म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त सिनेमे येतील. माझी हरकत नव्हती पण रवीने ते मान्य केले नाही”.
पुढे त्यांनी असं लिहिलं आहे की, “रंजना नेहमी इतरांना सांगायची की, गाडीत बसताना ड्रायव्हरच्या मागे कधीही बसू नये. कारण अपघात झाला तर ड्रायव्हर व त्याच्यामागे बसलेल्या माणसाला सगळ्यात जास्त धोका असतो. एकदा पहाटे ती तिच्या एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी निघाली होती. अर्थातच रंजना ड्रायव्हरच्या मागे बसलेली नव्हती. अजून पूर्ण उजाडलेले नव्हते. वेगात असलेली गाडी अचानक एका झाडाला धडकली. या अपघातात कुणाला खरचटलंसुद्धा नाही. रंजनाचे मात्र दोन पाय या अपघातात गेले आणि तिचं चित्रपटातलं करिअर संपुष्टात आलं”, असंही त्यांनी या पुस्तकात म्हंटल आहे.