प्रभू रामाची नगरी अयोध्या येथे २२ जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध व्यक्तिमत्त्वांना निमंत्रण पाठवण्याची प्रक्रिया सुरु असल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार सिनेविश्वातील कलाकार मंडळींना यावेळी आमंत्रण देण्यात आलं आहे. बऱ्याच बॉलिवूड कलाकारांना या सोहळ्याचं खास आमंत्रण देत उपस्थिती लावण्यास सांगण्यात आलं आहे. (Ranbir Kapoor And Alia Bhatt)
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट व अभिनेता रणबीर कपूर यांना रविवारी अयोध्येतील श्री राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अधिकृतपणे आमंत्रित करण्यात आले आहे. २२ जानेवारीला होणाऱ्या सोहळ्यात हे जोडपं सहभागी होणार आहे. आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, राज्य प्रचार प्रमुख अजय मुडपे, आरएसएस कोकण आणि चित्रपट निर्माते महावीर जैन यांनी रविवारी आलिया व रणबीरची भेट घेतली. यावेळी त्यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्री रामजन्मभूमी मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले.
काही दिवसांपूर्वी अभिनेते रजनीकांत यांनाही अभिषेक सोहळ्याला वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले होते. अक्षय कुमार, कंगना रणौत, अनुपम खेर, सनी देओल, प्रभास, अमिताभ बच्चन यांसह अनेक कलाकारांना राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेसाठी आमंत्रण मिळालं असल्याचं समोर आलं आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
मंदिर परिसरात रामलल्लाची मूर्ती स्थापित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात आधी आमंत्रण मिळालं आहे. आता रणबीर-आलियाचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ते आमंत्रण पत्र स्वीकारताना दिसत आहेत. या भव्य उदघाटन सोहळ्याआधी १६ जानेवारीपासूनच विविध कार्यक्रम सुरु होतील. चार हजार साधुसंतसह सात हजार लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.