Marathi Actor Ravindra Berde Died at 78 : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या ७८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मराठी सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते रवींद्र यांच्या निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांना मागील काही वर्षांपासून घशाचा कर्करोग झाला होता. त्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचारही सुरू होते. रवींद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. मात्र उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं. घरी आणल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पाठी पत्नी, दोन मुलं, सुना नातवंड असा परिवार आहे.
रवींद्र बेर्डे यांची आणखी एक ओळख म्हणजे ते मराठी चित्रपटसृष्टीचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. आपल्या भावाबरोबर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले होते. याशिवाय दोघांनी रंगभूमीही गाजवली. केवळ चित्रपट नाही तर ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर अक्षरशः धुमाकुळ केला. रवींद्र यांच्या विनोदी भूमिका फार गाजल्या.
रवींद्र यांच्या निधनाच्या बातमीने बेर्डे कुटुंब दुःखात आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन रवींद्र बेर्डे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वानंदी व अभिनय हे दोघेही पाहायला मिळत आहेत. स्वानंदीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये रवींद्र बेर्डे यांच्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांची प्रकृती नेमकी कशी होती हे दिसून आले.

आणखी वाचा – सदाशिव अमरापुरकर यांच्या घराला आग, एक जण जखमी, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, अन्…
रवींद्र बेर्डे यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘खतरनाक’, ‘धडाकेबाज’, ‘गंमत जंमत’, ‘होऊन जाऊ दे’, ‘हमाल दे धमाल’, ‘चंगू मंगू’, ‘थरथराट’, ‘उचला रे उचला’, ‘झपाटलेला’, यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते.