‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ हा शो अनेक स्पर्धकांना त्यांच्या यशापर्यंत पोहचवण्याचा मार्ग आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून अनेक मेहनती मुलं घडली असून आज ते गायक म्हणून सिनेसृष्टीत ताठ मानेने वावरत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’ हा गाण्याचा कार्यक्रम सुरु झाला होता. या शोमधील बच्चे कंपनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लागलेला पाहायला मिळाला. (Saregamapa Little Champs Winner)
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स्’च्या या पर्वात वैशाली म्हाडे व सलील कुलकर्णी या गायकांचे मार्गदर्शन बच्चे कंपनीला मिळाले. तर सुरेश वाडकर प्रमुख परीक्षक म्हणून लाभले होते. नुकताच या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे. यंदाच्या महाअंतिम सोहळ्यातश्रावणी वागळे, जयेश खरे, हृषिकेश ढवळीकर, देवांश भाटे, जयेश खरे व गौरी अलका पगारे यांनी स्थान मिळवले. या लहानग्यांमध्ये झालेल्या चुरशीच्या लढाईत कोपरगाच्या गौरी पगारे हिने बाजी मारत लिटल चॅम्प्सच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
गौरीला १ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश व चांदीची वीणा बक्षीस म्हणून मिळालं. तर उपविजेते ठरलेल्या श्रावणी वागळे व जयेश खरेला प्रत्येकी १ लाख रुपये बक्षिसरुपी मिळाले. तर इतर स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले गेले. यापूर्वी गाण्याचं कोणतंही शिक्षण न घेतलेल्या गौरीने केवळ मेहनतीच्या जोरावर ही बाजी मारलेली पाहायला मिळत आहे.
अत्यंत हलाखीचे दिवस पाहिलेल्या, खेडेगावात राहणाऱ्या तसेच जेवणाची आबाळ असणाऱ्या कुटुंबातल्या गौरीने या सर्वांवर मात करत विजय मिळवला. गौरीला तिची खरी ओळख मिळवून देण्यात ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’या मंचाचा मोलाचा वाटा आहे. वैशाली म्हाडे व सुरेश वाडकर यांनी गौरीची मेहनत पाहता तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे.