विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान ऑस्टेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत यंदाच्या विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरले. यावरून सर्व भारतीयांमध्ये नाराजीचा उमटलेला सूर पाहायला मिळाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना पाहण्यासाठी लाखोंच्या घरात क्रिकेटप्रेमी तसेच सिनेसृष्टीतील कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. शिवाय भारताचे अनेक माजी खेळाडू देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. (Abhijeet Kelkar On Kapil Dev)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या अंतिम सामन्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित केलं नव्हतं. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये आपला पहिला विश्वचषक जिंकला होता. यंदाच्या २०२३ च्या विश्वचषकासाठी बीसीसीआयने माजी खेळाडू कपिल देव यांना आमंत्रित केलं नव्हतं, असा दावा कपिल देव यांनी केला असल्याचं समोर आलं आहे. यावरून आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट संतापजनक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
अभिजीत केळकरने कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याने एक संतप्त पोस्ट त्याच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. “आयसीसी, क्रिकेट वर्ल्डकप, बीसीसीआयचा त्रिवार निषेध! हे अत्यंत चुकीचं असून याबद्दल लाज वाटली पाहिजे…लव्ह यू कपिल देव सर” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिजीतने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत.
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी संवाद साधत याचा खुलासा केला. ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार त्यांना अंतिम सामन्याचं बीसीसीआय कडून आमंत्रण मिळालं नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. कपिल देव यांनी म्हटलं की, “मला माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर (१९८३ ची टीम) हा अनुभव घ्यायचा होता पण, सोहळ्यासाठी आम्हाला आमंत्रण दिलं नाही. त्यांनी मला बोलावलं नाही म्हणून मी गेलो नाही. अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी लोक विसरून जातात” असं मत त्यांनी मांडत नाराजी व्यक्त केली.

अभिजितच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “आमंत्रण शिवाय गेले असते तर तुमचा मोठेपणा दिसला असता टीम आपली होती आपल्या टीमसाठी आमंत्रण कशाला हवं” यावर प्रतिउत्तर देत अभिजीतने नेटकऱ्याची बोलतीच बंद केली आहे. अभिजीत कमेंट करत म्हणाला, “तुम्ही पण सगळीकडे आमंत्रणाशिवायच जाता का? जरा विचार करून बघा”. यावर त्या नेटकऱ्याने अभिजीतचं म्हणणं पटलं असल्याचं कबूलही केलं.