कलाकार मंडळींना नेहमीच कामानिमित्त अनेक परदेश दौरे करावे लागतात. दरम्यान हे दौरे करताना ते विमानाने प्रवास करणं सोयीचं समजतात. विमानाने प्रवास करताना त्यांना आलेले अनुभव ते कायमच सोशल मीडियावरून शेअर देखील करतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याचा पहिल्या विमान प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. हा विमान प्रवास या अभिनेत्याने पहिल्यांदाच केला असल्याचं समोर आलं आहे. शिवाय मेहनतीच्या जोरावर आणि स्वखर्चाने त्याने हा विमान प्रवास केला आहे. हा अभिनेता आहे निरंजन कुलकर्णी. (Niranjan Kulkarni Post)
छोट्या पडद्यावरून घराघरांत पोहोचलेला अभिनेता निरंजन कुलकर्णी हा ‘आई कुठे काय करते’ मालिकेत महत्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतील त्याची अभि ही भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली असून त्याच्या या भूमिकेवर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होतो. अभिनयाबरोबरच निरंजन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून त्याचे अनेक फोटोज व व्हिडिओज त्याच्या चाहत्यांसह शेअर करत असतो. अशातच निरंजनने शेअर केलेल्या त्याच्या पहिल्या विमान प्रवासाची झलक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.
निरंजन कुलकर्णीने त्याच्या पहिल्या विमान प्रवासाचा व्हिडीओ इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून त्याने, “पहिला विमान प्रवास, ऊंच ऊंच अन् दूर” असं म्हटलं आहे. हा प्रवास निरंजनचा पहिला प्रवास असून तो कुठेतरी फिरायला जाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे. पहिला विमानप्रवास हा सर्वांसाठीच खास असतो, त्याची आठवण ही बरेचजण सोशल मीडियावरून शेअर करतात. अशातच निरंजनच्या या पहिल्या विमान प्रवासाचा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याच्या या प्रवासाबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
निरंजन एक उत्तम अभिनेता आहेच, या शिवाय तो एक उत्तम व्यावसायिकही आहे. खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी निरंजनने स्वतःचं कॅफे ठाण्यात सुरू केलं आहे. निरंजनने २५ हुन अधिक मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत, मात्र त्याला खरी प्रसिद्धी ही ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे मिळाली आहे.