अभिनेता लोकेश गुप्ते मराठी सिनेसृष्टीत एक उत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर त्याची पत्नी अभिनेत्री चैत्राली गुप्ते ही देखील मराठी अभिनयसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. आता या दोघांची लेक शुभवी गुप्ते लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. शुभवी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिला बऱ्याच वेळा तिच्या वडिल लोकेशसह मजेशीर रिल्स बनवताना पाहायला मिळतं. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. नेटकरीही बऱ्याचदा तिचं कौतुक करताना दिसतात. मात्र आता कौतुक थेट दिल्लीहून करण्यात आलं आहे. कारणही काही तसं खास आहे. (shubhavi gupte received a letter from PM)
चैत्राली-लोकेश यांची कन्या शुभवीची ख्याती दिल्लीपर्यंत पोहोचली आहे. शुभवीला थेट दिल्लीहून पंतप्रधानांचं पत्रं आलं आहे. चैत्रालीने विशेष पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे. शुभवीचा पत्रकाबरोबरचा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, अत्यंत अभिमाननाचा क्षण तोही बालिका दिनानिमित्त. किप इट अप शुभी! असं लिहित तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभवीला पंतप्रधानांकडून आलेल्या पत्रात लिहिलं की, “प्रिय शुभवी गुप्ते, माझे प्रेमळ आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि त्यावर तुमचे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासारख्या तरुण नागरिकांचे विचार जाणून आणि समजून घेणे नेहमीच प्रोत्साहन देणारे असते. आजच्या तरुण पिढीची ऊर्जा, आत्मविश्वास आणि क्षमता पाहून मला खूप अभिमान वाटतो. राष्ट्राच्या अपेक्षा आणि आकांक्षा त्याच्या युवाशक्तीशी घट्टपणे जोडलेल्या आहेत. आज तरुणांसाठी असंख्य पर्याय आणि संधी खुल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, नवोपक्रम, क्रीडा किंवा स्टार्टअप्स असोत, भविष्य घडवण्यासाठी निवडलेल्या कोणत्याही क्षेत्रात सुविधा आणि संसाधनांची अजिबात कमतरता नाही. पुढील २५ वर्षे हा भारतासाठी अमृत काळ असणार आहे, एक गौरवशाली, विकसित आणि सर्वसमावेशक राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प घेऊन पुढे जाण्याचा हा काळ आहे. तुमचे शिक्षण, करिअर, व्यक्तिमत्त्व विकास आणि चारित्र्य घडवण्याच्या दृष्टीनेही ही २५ वर्षे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. जसजसे तुम्ही तुमचे भविष्य घडवत जाल, तसतसे देशाचे भविष्यही नवी दिशा गाठेल.भारताची युवाशक्ती आपल्या वैयक्तिक ध्येयांची राष्ट्रीय प्रगतीशी सांगड घालून देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, याचा मला विश्वास आहे.
आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही यशस्वी व्हाल असा विश्वासासह मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आपला नरेंद्र मोदी” असं लिहीत तिने ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग घेत त्यावर विचार मांडल्याबाबत तिचे आभार मानले आहेत. या पोस्टवर नेटकरी लाईक व कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री मुग्धा गोडबोलेने टाळ्यांचा इमोजी शेअर करत तिचं कौतुक केलं आहे. अशा बऱ्याच कलाकारांनीही कमेंट करत तिचं अभिनंदन केलं आहे.