‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली. मालिकेमध्ये अधिपती साकारणारा ऋषिकेश शेलार असो नाहीतर अक्षरा साकारणारी शिवानी रांगोळे असो त्यांनी आपल्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेत वेळोवेळी येणारे ट्वीस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवताना दिसत आहेत. त्यामुळे या मालिकेने कमी कालावधीत टीआरपीच्या शर्यतीत टॉपची जागा मिळवली आहे. आता येत्या १ तारखेला मालिकेचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. त्यात प्रेक्षकांना अक्षरा(शिवानी रांगोळे) व अधिपती(ऋषिकेश शेलार) यांचा विवाहसोहळा पाहायला मिळेल. (akshara bride wedding look)
अक्षरा-अधिपतीच्या लग्नाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता ऑक्टोबरच्या १ तारखेला या दोघांच्या लग्नाचा मुहुर्त ठरला आहे. वेळोवेळी मालिकेत येणारे ट्विस्ट अक्षरा-अधिपतीच्या लग्नात अडथळा निर्माण करणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. पण लवकरच प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोडीचा शाही विवाहसोहळा पाहायला मिळणार आहे. लग्नात मुख्य पात्रांच्या लूकवर विशेष लक्ष देण्यात आलं आहे.

या फोटोंमध्ये अक्षराचा मोहक लूक पाहायला मिळणार आहे. अक्षरा हिरव्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहे. तिने साडीला साजेसे दागिने घातले आहेत. कोल्हापुरी साज, बाजूबंध, हातात तोडे, नाकात नथ, कानात झुमके, कंबरेत कंबरपट्टा, केसात खोपा लावला आहे. याशिवाय तिने कपाळावर लावलेली चंद्रकोर प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेणारी आहे.

अक्षरा नववधूच्या लूकमध्ये अगदी गोंडस दिसत आहे. त्याचबरोबरीने तिच्या मंगळसूत्राची डिझाइन विशेष आकर्षित करत आहे. कोणताही फॅशन ट्रेंड फॉलो न करता लांबलचक मंगळसूत्र अक्षराच्या गळ्यामध्ये दिसत आहे. काळ्या मण्यांमध्ये हे मंगळसूत्र तयार करण्यात आलं आहे. तिच्या या मंगळसूत्राचा ट्रेंड महिलावर्गाचाही पसंतीस उतरणार एवढं नक्की.