सध्या सोशल मीडिया हे रोजच्या जीवनातील साधन झालं आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कलाकार मंडळींच्या रील्स, व्हिडीओची तसेच सोशल मीडिया स्टारच्या रील्सची प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. कित्येक कलाकार आहेत जे आजवर त्यांच्या रील्समुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. ट्रेंडिंग गाण्यांवर रील्स करून ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर देखील करत असतात. अनेक मराठमोळे कलाकार हे त्यांच्या अभिनयापेक्षा आजकाल रील्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Gargi Phule Post Viral)
या रील्स व्हिडीओवरून एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेली पोस्ट चर्चेत आहे. ज्येष्ठ नागरिक जेव्हा रील्स, व्हिडीओ करतात त्यांना या मराठमोळ्या अभिनेत्रीने टोला लगावला आहे. फेसबुक पोस्ट करत ती या विषयावर व्यक्त झाली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गार्गी फुले. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची ज्येष्ठ कन्या गार्गी फुले हिने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्सवरून भाष्य केलं आहे. गार्गी फुले हिने ‘राजा राणीची गं जोडी’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. स्पष्टपणे भाष्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत गार्गी फुले हे नाव आवर्जून घेतलं जात.

याबाबतची एक पोस्ट फेसबुकवरून शेअर करत तिने म्हटलं आहे की, “एखाद्याची कला लोकांसमोर सादर करायचं सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. रिल्स, पोस्ट याद्वारे कलाकार वारंवार व्यक्त होत असतात. पण कधी कधी सिनियर लोकांच्या रिल्स पाहिल्या की भीती वाटते. योगासनं, छान गाणी इथपर्यंत मी समजू शकते. पण पावसात भिजताना, शॉर्टस् घालून भटकंती करताना, गणपतीसमोर उड्या मारताना आपल्या वयाचा यांना विसर पडतो का?. यांना कोणाबरोबर बरोबरी करायची आहे?. आणि हे जर कामं मिळवण्यासाठी असेल तर काकू, आई व सासू तसेच काका, सासरे, वडील याच भूमिका करताना दिसतात. मग हे वेडेचाळे करण्यामागे नक्की काय कारण आहे?. कोणी सांगेल का? असो.” असं म्हणत तिने स्वतःच मत व्यक्त केलं आहे.
सिनियर सिटीझनला अशा या ट्रेंडिंग गाण्यांवर ठेका धरताना पाहून गार्गी फुलेने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे.