Akhil Mishra Passed Away : गेल्या काही महिन्यांमध्ये कलाविश्वामधील दिग्गज मंडळींनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आणखी एक दुःखद घटना समोर आली आहे. ‘३ इडियट्स’ चित्रपटामधील अभिनेते अखिल मिश्रा यांचं निधन झालं आहे. ते ६७ वर्षांचे होते. त्यांनी या चित्रपटामध्ये लायब्रेरियन दुबे ही भूमिका साकारली होती. अखिल यांचं अचानक निधन झाल्यानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांचं कुटुंबियही कोलमडून गेलं आहे.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, अखिल गेल्या काही दिवसांपासून उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्रस्त होते. स्वयंपाकघरामध्ये टेबलवर उभे असताना त्यांचा तोल गेला. दरम्यान जमिनीवर कोसळल्यानंतर त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. अखिल यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. अखेरीस काही तासांमध्येच त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
अखिल यांची पत्नी सुझान बर्नर्टही अभिनेत्री आहे. ती हैद्राबादमध्ये चित्रीकरण करत होती. पतीच्या निधनाची बातमी ऐकताच चित्रीकरण सोडून ती घरी पुन्हा परतली. पतीच्या निधनानंतर सुझान पूर्णपणे कोलमडून गेली आहे. अखिल यांच्या शेवटच्या क्षणी सुझान त्यांच्याबरोबर होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार सुझानने मोजक्याच शब्दांमध्ये भावना व्यक्त केल्या. “मी पूर्णपणे कोलमडून गेली आहे. माझा जोडीदारच मला सोडून गेला”. असं अखिल यांच्या पत्नीने म्हटलं. अखिल यांनी चित्रपटांबरोबरच हिंदी मालिकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. ‘सीआयडी’, ‘उतरन’, ‘उडान’, ‘श्रीमान श्रीमती’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका हिट ठरल्या.