कलाकार मंडळींना शुटिंगनिमित्त कायमच परदेश दौरे हे करावे लागतात. परदेश दौऱ्यानिमित्त आलेले अनेक अनुभव हे कलाकार चाहत्यांसह सोशल मीडियावरून शेअर देखील करत असतात. बरेचदा विमानात वा विमानतळावर आलेला अनुभव ही कलाकार मंडळी सोशल मीडियावरून शेअर करत असतात. अशातच अभिनेता संकर्षण कऱ्हाडेच्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संकर्षण काही दिवसांपूर्वी ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याची फ्लाईट उशिराने असल्याने एक रात्र विमानतळावरच काढली होती. त्यानंतर आता संकर्षणने त्याला विमानांत आलेला अनुभव शेअर केला आहे. विमानातून प्रवास करताना पहिल्यांदा संकर्षणला विमानाचं केबिन पाहायला मिळालं, याचा आनंद त्याने पोस्ट करत शेअर केला आहे. (Sankarshan Karhade Shared Experience)
संकर्षण विमानाच्या केबिन मधील पायलटबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “माझा हा अनुभव वेळ असेल तर नक्की वाचा. कॅनसास सिटीहून क्लिव्हलॅंडला जाण्यासाठी विमानांत शिरलो तर फार गर्दी नव्हती. विमान ऊडतं कसं, कसं चालवतात, याविषयी मनांत कायम प्रश्नं पडलेले असतात म्हणुन दरवेळी मी विमानांत बसताना कुतूहलाने केबीनकडे बघतोच. आजही तेच केलं. तर हे “पायलट साहेब” (आपल्याकडच्या ड्रायव्हर साहेब , कंडक्टर साहेब सारखं म्हणतोय) जरा मोकळे ढाकळे वाटले. माझ्याकडे बघुन, स्वत:हून हसले. आपल्याला “ऊडवून नेणारा पायलट” आपल्याला स्वत:हून स्माईल देतोय म्हणल्यावर हेच मोफत स्माईल दूपटीने परत करायला कसला भाव खायचा? म्हणुन मी त्यांच्यापेक्षा जास्तं मोकळा ढाकळा हसलो आणि त्याच्या केबीनकडे “काय भाऊ, येऊ का घरांत ??” च्या नजरेनेच पाहिलं. त्यालाही ते कळलंच”.
“त्याने मग स्वत:हून “Welcome to my working area” असं म्हणाल्यावर मी फार फार खुष झालो गड्या. पहिल्यांदाच विमानाच्या केबिनमध्ये पाय ठेवला. जिथुन २००/३००/४०० लोकांना घेऊन ही विमानं ऊडत असतात. खूप सारे बटन्स, पायलटची खुर्ची, माॅनिटर, टेक ऑफ लॅंडिंग ची ती दांडी मज्जा वाटली पाहातांना. मला झालेला एकंदरीत आनंद पाहता तो परत स्वतःहून म्हणाला, “सिट देअर अँड क्लिक अ पिक्चर”. मी पाहतच राहिलो. मला प्रश्नं पडला की, हा माझ्या चेहरऱ्यावरचा अती आनंद पाहून मनांत मला वेड्यात काढून माझी गंमत करतोय का?? मग मी जरा कंट्रोल्ड वागायची ऍक्टिंग करत “No no , Its ok” वगैरे म्हणालो तर “कॅप्टन पिटर रसल भाऊंनी” आग्रहाने पायलट सिटवर बसवलं आणि माझा फोटो घेतला. आर काय आनंद झाला म्हणुन सांगू ?? मग प्रथेप्रमाणे ”Can I click a Picture with you” असं वाक्यं कुणीतरी एकजण म्हणतंच ते मी म्हणालो आणि पिटर भाऊंसोबत फोटो काढला”.
“थोड्या गप्पा झाल्या, नंबर एक्सेंज झाले, अजुन जरावेळ एकत्रं घालवला असता तर तो म्हणाला असता की, “विमान चालवतोस का ? किंवा मी तरी म्हणालो असतो “हो बाजूला मीच चालवतो” पण त्याच्या आतच संभाषण थांबलं आणि मी माझ्या सीटवर येऊन बसलो आणि पूर्ण प्रवासभर आता तो हे बटन दाबत असेल, आता तो स्पिकरवर बोलत असेल, असा विचार करत आनंदात बसुन राहिलो. लोकंहो विचार करा. जरा स्माईल दिलं, प्रेमानं बोललं की, मनांत असलं ते सगळं होतं.
आज विमानाचं केबिन पाहिल्यामुळे मी मात्रं हवेत आहे”.