अभिनय हे एक असं क्षेत्र आहे, ज्यात कलाकार मोठा असो वा लहान त्यांच्या कलाकृतीचं कौतुक केलं जातं. अशाच कौतुकाची थाप मिळालेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतेय. बरं ही पोस्ट दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून अभिनेते मिलिंद गवळी यांची आहे. वयाने, अनुभवाने मोठ्या असणाऱ्या मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावरून त्यांच्याहुन लहान असणाऱ्या एका कलाकाराचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ही पोस्ट त्यांनी त्यांना शिकवणाऱ्या शिवम वानखेडे या डान्सरबद्दल केली आहे. सुरुवातीला डान्स नको म्हणणाऱ्या मिलिंद यांना शिवमने डान्सची ओढ कशी लावली हे त्यांना देखील कळलं नाही. (Milind Gawali Special Post)
इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शिवम वानखेडेसाठी मिलिंद यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. यांत त्यांनी लिहिलंय की, “‘मूर्ती लहान कीर्ती महान’. शिवम हा उत्कृष्ट डांसर आहे, डान्स कोरिओग्राफर वैभव घुगे यांना शिवम associate करतो आणि पहिल्यांदा स्टार प्रवाहच्या कार्यक्रमांमध्ये डान्स करण्यासाठी माझी निवड झाली, याचं मला खूप आश्चर्य वाटलं होतं आणि भीती सुद्धा वाटली होती. मी वैभव घुगे यांना भेटलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की डान्सचा आणि माझा बरेच वर्षापासूनचा घोळ आहे,त्यामुळे तुम्ही माझ्या ऐवजी दुसरं कोणाला तरी घ्या”.
“यावर वैभव म्हणाले, शिवम तुम्हाला दाखवेल एकदा करून पहा, नाही जमलं तर आपण दुसरं कोणाला तरी घेऊ. त्यानंतर शिवमने मला साध्या, सरळ, सोप्या पद्धतीने तो डान्स शिकवला आणि माझा कॉन्फिडन्स वाढवला. बरं त्यानंतर मी परफॉर्मन्सही केला. माझं कौतुक ही झालं. ही डान्सची तयारी करत असताना मला एक सातत्याने जाणवत होत की, शिवम हा अतिशय तयारीचा डान्सर आहे. त्याची लवचिकता आणि सहजता ही वाखण्याजोगी आहे”.
“एका महिन्यापूर्वी शिवमचे वडील वारले. त्यावेळेला तो Sony tvच्या डान्स रियालिटी शो India’s Best dancerमध्ये स्पर्धक होता. आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या दु:खद घटनेनंतर ही शिवम तिसऱ्या दिवशी परत त्या डान्सच्या रियालिटी शोमध्ये पुन्हा उभा राहिला. शिवम हा जगावेगळा आहे. ‘मूर्ती लहान आणि कीर्ती महान’. शिवमचा एक एक परफॉर्मन्स बघून माणसाला थक्क व्हायला होतं. इतके कष्ट, इतकी प्रॅक्टिस, इतकी मेहनत आणि ते ही मनाची स्थिती ही नाजूक असताना ज्या वेळेला माणूस जिद्दीने मेहनत करतो, त्यावेळेला खरंच त्या व्यक्तीला सलामच करावसं वाटतं”.

“मला स्वतःला अभिमान वाटतो की, मला या अशा व्यक्तींबरोबर काम करायची संधी मिळाली आहे. शिवमला पुढच्या प्रवासासाठी माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आशीर्वाद. नक्कीच तो त्याच्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार. शरीराने जरी आज त्याचे वडील त्याच्याबरोबर नसले तरी मनाने ते सदैव त्याच्याबरोबर असणार आहेत आणि त्याला शुभ आशीर्वाद देतच राहणार आहेत”.