Rocky Aur Rani Kii Prem Kahaani : आलिया भट्ट व रणवीर सिंह यांच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. कारण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. या चित्रपटाचं प्रमोशनही दणक्यात करण्यात आलं. या चित्रपटातील रणवीर सिंह व आलिया भट्ट कायमच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. त्यांच्या मागोमाग आता आणखी एका अभिनेत्रीची मोठी चर्चा सुरु झाली आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटातील अभिनेत्री अंजली आनंद सध्या चर्चेत आली आहे. अंजली आनंद हिने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली होती. अंजलीला मोठ्या पडद्यावर पाहणे रंजक ठरलं असलं तरी धर्मा प्रॉडक्शनसोबत काम करेपर्यंत तिचा प्रवास सोपा नव्हता. या मोठ्या मजलपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या मेहनतीचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय. एका मुलाखतीत अंजलीने तिच्या या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबाबत खुलेपणाने चर्चा केली आहे.
पाहा ऑडिशन देताना नेमकं काय घडलं होतं (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)
अंजलीने हा चित्रपट मिळण्याचा अनुभव शेअर करत म्हटलं की, “‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी मला ऑडिशन द्यायचं होतं. यासाठी मी एक क्लिप तयार केली होती. ही क्लिप रेकॉर्ड करण्यासाठी मला तब्बल ४ तास लागले होते. एक, दोन नाही तर २०० टेक घेतल्यानंतर मी क्लिप रेकॉर्ड केली. या रेकॉर्डिंग दरम्यान मला अनेकदा पॅनिक अटॅकदेखील आले. या सिनेमात भूमिका साकारण्याआधी ऑडिशनसाठी क्लिप तयार करणं माझ्यासाठी अतिशय कठीण झालं होतं. चित्रपटातील ही भूमिका काही माझ्या वाट्याला येत नाही, असंही मला वाटत होतं. पण नशीबात हा चित्रपट होता”, असं अंजली म्हणाली.
याबाबत बोलताना तिने सांगितलं की, “मला जेव्हा चित्रपटासाठी कॉल आला. तेव्हा असं सांगण्यात आलं की, करण जोहरला अनेकांनी या भूमिकेसाठी तुझं नाव सुचवलं आहे. करणने तुझं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहिलं, पण त्याला तुला एकदा परफॉर्म करताना पाहायचं आहे”.

रणवीरच्या बहिणीची भूमिका साकारण्यासाठी ऑडिशन देताना अंजलीला चार वाक्य पाठवण्यात आली होती. ती वाक्य रेकॉर्ड करुन तिला ऑडिशन म्हणून पाठवायची होती. याबाबत बोलताना अंजली म्हणाली, “टीव्हीवर १५ पानी सीन एका टेकमध्ये करते, पण या चार ओळींचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मला चार तास लागले. व्हिडिओ रेकॉर्ड करताना अनेकदा पॅनिक अटॅक आले, व्हिडिओ रेकॉर्ड करताना सतत मनात आपली या सिनेमासाठी निवड होणार नाही, असंच वाटत राहिलं. मी सतत रडत होती, पण मी चुकीची होती. मी स्वत:ला अतिशय हलक्यात घेतलं होतं”, असंही अंजली म्हणाली.