छोट्या पडद्यावरील गुणी अभिनेत्रींपैकी एक म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानीने मालिकांमधून साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. झी मराठी वाहिनीवरीलही ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत तिने साकारलेली अक्षराची भूमिका तर घराघरांत पोहोचली. आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची उत्तम पर्वणीच होती. अक्षरा व अधिपतीची लव्हस्टोरी आणि मालिकेची रंजक कथा प्रेक्षकांना विशेष भावली. मालिकेला निरोप देताना कलाकारही भावुक झाले. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत कलाकारांनी त्यांचं मन मोकळं केलं. आता शिवानीच्या सासूबाई म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे. (Mrinal Kulkarni post for shivani rangole)
सूनेचं कौतुक करणारी पोस्ट मृणाल यांनी शेअर केली. तसेच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या संपूर्ण टीमचंही त्यांनी कौतुक केलं. मृणाल यांनी म्हटलं की, “तुम्हाला काम उत्तम मिळतं. पण नेहमीच सहकलाकारांशी, दिग्दर्शकांशी आणि एकूणच टीमशी गट्टी जमतेच असं नाही. झी मराठीच्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेच्या बाबतीत मात्र असं झालं नाही”.
“शिवानी, ऋषिकेश आणि माझी मैत्रीण कविता यांनी उत्तम अभिनय आणि मस्त मज्जा केली. दिग्दर्शक आणि इतर कलाकारांनी, सहकाऱ्यांनीही त्यांना उत्तम साथ दिली. शर्मिष्ठा राऊतची ही पहिलीच मालिका पण इतक्या पटकन तिने छान जम बसवला. कल्याणी पाठारेचं विशेष कौतुक. इतक्या समर्थपणे ती झी मराठी वाहिनी सांभाळत आहे”.
“मधुगंधा नेहमीच वेगवेगळा आशय आणते हे तिनं पुन्हा एकदा सिद्ध केलं. अनेक पारितोषिकांची लयलूट करून आणि खूप मस्त कौतुक करवून घेऊन या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला. आज टीमला नक्कीच वाईट वाटत असेल. पण When one thing ends, it gives birth to so many new opportunities. हे कायम लक्षात ठेवा. मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा”. आता कुठे आमची गुणी सून आमच्या हाती लागणार आहे. आता मला धडा शिकवला नाही म्हणजे झालं”. मृणाल यांनी अगदी छान शब्दांमध्ये सगळ्यांचं कौतुक केलं. तसेच सूनेबाबत त्यांचं असलेलं प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं.