जरा थांबा ना, मागे वळून पाहा ना बघा बालपणी आपल्याला सावरणारी आई कुठे दिसते का?. ताट घेऊन जेवण भरवायला धावणारी ती, आंघोळ घालायला धडपडणारी ती, शाळेत सोडण्यासाठी मागे मागे लागणारी ती बघ ना एकदा आठवते का?. आठवलं ना तुम्हालाही तुमचं बालपण. कधीतरी एकांतात बसल्यावर बालपणीच्या आठवणी आणि सतत आपल्या मागे मागे करणारी आई आठवते आणि टचकन डोळ्यांत पाणी येतं. पण आईची माया, तिचं सुख हे सगळ्यांच्याच नशिबात असतं का?. तर याचं उत्तर नाहीच आहे. आपल्या वाट्याला आई आहे ही देवाची देणगी. पण ज्याने लहानपणापासूनच आई बघितलीही नाही त्याला विचारा तिची किंमत. सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि ऋता दुर्गुळेच्या सासूबाई मुग्धा शाह यांनी आईला कधी पाहिलंच नाही. पण आई नसल्यामुळे त्यांना काय काय सहन करावं लागलं हे ऐकूनच अंगावर काटा आला. (Actress mugdha shah struggle after mother death)
वडील नसले तरी चालेल पण आई गेल्यावर…
मुग्धा तीन महिन्यांच्या असतानाच त्यांची आई गेली. त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलं ते फक्त दुःख नी दुःखच. याचविषयी मनोरंजन विश्व मराठीला त्यांनी मुलाखत दिली. मुग्धा म्हणाल्या, “आई हा शब्द माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. कारण मी माझ्या आईला कधी पाहिलंच नाही. माझा जन्म झाला आणि तीन महिन्यांमध्ये माझी आई वारली. त्याच्यामुळे मी माझ्या आईला पाहिलंच नाही. आई हा शब्द, त्याच्या मागच्या भावना, जबाबदाऱ्या मी कधीच बघितलं नव्हतं. मला असं वाटतं की, एकवेळ वडील नसले तरी मुलं मोठी होतात. पण आई नसली तर एखाद्या बाळाचे किती हाल होतात?, कसं ते जगतं?, कसं ते वाढतं?… हे समजण्यापलिकडे आहे”.
त्रास, छळ, मार बघितला
“मी तीन महिन्यांची झाल्यानंतर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर सुख काय असतं? हे मला माहित नाही. पण दुःख काय असतं? हे मला डोंगराएवढं माहित आहे. अन्न, भूक काय असते? मी हेच बघितलं आहे. त्रास, छळ, मार बघितला आहे. उद्धवस्त आयुष्य बघितलं आहे. बालपणच माझं उद्धवस्त होतं. वयाच्या २०व्या वर्षापर्यंत माझं लग्न झालं. तोपर्यंत मी जिवंत कसे? हा प्रश्न होता. ज्योतिषांनाही मी जेव्हा पत्रिका दाखवायला जायचे तेव्हा तेही म्हणायचे की तू जिवंत कशी?”.
आणखी वाचा – प्रिन्स नरुलाने बायकोची गर्भनाळ स्वतःच कापली अन्…; युविका चौधरी म्हणाली, “सी-सेक्शन पाहिलं, शूट करत…”
पाचवेळी आत्महत्याचा प्रयत्न, २०व्या वर्षी लग्न
पुढे त्या म्हणाल्या, “लहान असताना मला खूप राग यायचा. कारण दीड ते दोन वर्षांची लहान मुलगा १७-१८ वर्षांची होईपर्यंत भूकेसाठी फक्त लालची नजरेने बघते. मला कोण काय खायला देईल का? हे बघते. हे आयुष्य जगणारी मी बाई. त्यावेळी असं वाटायचं की, या आयुष्याचा काय उपयोग आहे?. मला आठवतंय २०व्या वर्षी माझं लग्न झालं. तोपर्यंत मी दोनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोन्हीवेळा मी यामधून वाचले. प्रयत्न करुन आले असं तीनवेळा झालं. म्हणजे एकूण पाचवेळा मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. माझे महाराज सगळं ऐकत आहेत. मी या सगळ्यातून बाहेर आले. मला असं वाटतं की, एक दैवी शक्ती आहे. आता मी अध्यात्म या विषयाचा अभ्यास करते. आता कळतं की, कर्म, आयुष्य कसं जोडलेलं असतं. आपले प्रारब्ध आहेत. आता मला त्या सगळ्या गोष्टी त्रास देत नाहीत. पण आठवणी कायमस्वरुपी राहतात ना. आईचं प्रेम कधी मिळालंच नाही. मला एका ठिकाणी वडिलांनी जॉबला लावलं होतं. तिथे इतर मुली आईने दिलेला डबा आणायच्या. तेव्हा मला असं वाटायचं की, हे माझ्या वाट्याला का नाही?. वीस वर्षांचा तो एक काळ होता”. मुग्धा यांनी एवढं सगळं सांगितल्यानंतर आपलं दुःख त्यांच्यासमोर काहीच नाही हे लक्षात येतं.