शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे नाव चर्चेत आलं. समीर वानखेडे हे नाव गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणात त्यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरण सगळीकडेच गाजत असताना त्यांनी स्वतः हुशारीने स्वतःची संपूर्ण जबाबदारी निभावली. आता एकंदरीतच त्यांचं काम, ड्रग्ज प्रकरण यावर समीर वानखेडे भाष्य करणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुपते’ कार्यक्रमामध्ये समीर वानखेडे हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रोमो आता समोर आले आहेत.
झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ‘खुपते तिथे गुप्ते’च्या नव्या भागाचे प्रमो शेअर केले आहेत. या प्रोमोमध्ये समीर वानखेडे बेधडक बोलताना दिसत आहेत. “सेलिब्रिटींना विमानतळावर सगळ्यात जास्त भीती समीर वानखेडे या नावाची वाटायची. वानखेडे मुद्दाम सेलिब्रिटीची खूप जास्त तपासणी करायला लावतात असं लोक म्हणायचे” असं अवधुत गुप्तेने समीर वानखेडे यांना विचारलं.
यावर त्यांनी उत्तर दिलं की, “माझ्यासाठी सेलिब्रिटी म्हणजे बाबा आमटे, सिंधुताई सकपाळ, एपीजे अब्दुल कलाम. विमानतळावर असताना जवळपास साडेतीन हजार केस होत्या. त्यामध्ये तुमच्या भाषेमध्ये जे सेलिब्रिटी तुम्ही म्हणता ते किती असतील? ५०, १५०, १०० असतील… पण बाकीचे जे लोक आहेत ते कोण आहेत? बाकीचे लोक गंभीर गुन्हे करणारे, ड्रग पेडलर्स आहेत. त्यांच्याबद्दल कुणीच काही सांगत नाही”.
तसेच ड्रग्जचं सेवन करणं म्हणजे फक्त शरीराचं नव्हे तर राष्ट्राचंही नुकसान असल्याचं समीर वानखेडे यांचं म्हणणं आहे. ड्रग्जचं सेवन करणं पूर्णपणे बंद झालं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आता या कार्यक्रमामध्ये ते आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत काही भाष्य करणार का?, या प्रकरणाविषयी काही खुलासा करणारा का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.