Rakesh Poojary Death : हसत-खेळत असलेल्या व्यक्तीचं क्षणात निधन होणं याबाबत अनेक घटना कानावर येतात. आता अशीच एक दुःखद बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुप्रसिद्ध कलाकार राकेश पुजारीचं रविवारी (११ मे) निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. राकेशच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एका कार्यक्रमात गेला असता त्याला अचानक त्रास होऊ लागला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर जागीच राकेशचं निधन झालं. त्याच्या जाण्यानंतर संपूर्ण कुटुंबियांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Rakesh Poojary Death)
पीटीआयच्या वृत्तानुसार, राकेश उडुपी जिल्ह्यामधील करकला येथील एका गावी मेहंदी कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रमामध्ये तो उपस्थित राहिला. तोपर्यंत सगळं काही ठिक होतं. शिवाय कोणतीच शारीरिक समस्या त्याला जाणवली नाही. मात्र कार्यक्रम सुरु झाल्यानंतर राकेशला त्रास होऊ लागला. कार्यक्रमातच त्याला हृदयविकाराचा झटका झाला. काही कळायच्या आतच राकेशने शेवटचा श्वास घेतला.
आणखी वाचा – भारत-पाकिस्तान तणावात अमृतसरमध्ये भारती सिंहचं कुटुंब, स्वतः थायलंडला जाताच ट्रोल, खूप रडली अन्…
या मेहंदी कार्यक्रमातील राकेशचे काही शेवटचे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तो मित्र-मंडळींसह विविध पोज देत फोटो काढताना दिसत आहे. त्याचे हे फोटो निधनाआधीच्या काही तासांपूर्वीचेच आहेत. ते पाहून अनेकांना मोठा धक्का बसला. राकेशच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना हळहळ व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांनीही सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
राकेशचा जवळचा मित्र व अभिनेता शिवराज केआर पीटने म्हटलं की, “त्याला शारिरीक कोणतीच समस्या नव्हती. तो त्याच्या गावी गेला. तिथे एका मित्राच्या लग्नाच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तिथे त्याने डान्सही केला”. राकेशचा बीपी कमी झाला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला अशीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. ‘कॉमेडी खिलाडीलु सीझन ३’ शोचं विजेतेपद राकेशने पटकावलं. या शोनंतर त्याचं आयुष्यच बदललं. कन्नड तसेच तेलुगू चित्रपटांमध्ये काम करत त्याने कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पेटकम्मी, अम्मेर पोलिस, पम्मना द ग्रेट, उमिल, इलोकेल सारख्या चित्रपटांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका विशेष उल्लेखणीय ठरल्या.