मराठीमध्ये आता नवनवीन चित्रपट येत आहेत. मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी तर प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटाची मेजवानी असणार आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील अंकुशचा लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये आणखीनच उत्सुकता वाढली होती. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ चा ट्रेलर लाँच सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी नवापूर पोलीस स्टेशनचे रिक्रिएशन करून जेलमध्ये हा सोहळा संपन्न झाला. चित्रपटातील पोलीस अधिकारी बेड्या ठोकून अंकुशला जेलमध्ये घेऊन आले. त्याची धमाकेदार एन्ट्री सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. (psi Arjun movie trailer)
मराठीतील हा भव्यदिव्य ट्रेलर लाँच सोहळा पाहण्यासाठी कलाकारांची गर्दी जमली होती. ट्रेलरमध्ये अंकुशची व्यक्तिरेखा संभ्रम निर्माण करणारी दिसत आहे. त्यामुळे तो नक्की चोर आहे की पोलीस, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील डॅशिंग लूक, ॲक्शन आणि कमाल डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ट्रेलर पाहून चित्रपटात अनेक रहस्य दडलेले असल्याचं दिसतं.
ट्रेलरबद्दल दिग्दर्शक भूषण पटेल म्हणाले, ‘’मराठी प्रेक्षक चोखंदळ असल्याने त्यांच्यासाठी एखादा जबरदस्त चित्रपट घेऊन येण्याची खूप इच्छा होती. हा एक असा चित्रपट आहे, ज्यात ॲक्शन, सस्पेन्स, रोमान्स सगळंच आहे. त्यामुळे फॅमिलीसाठी हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज आहे”.
निर्माते विक्रम शंकर म्हणाले, “चित्रपट पोलिसांवर आधारित असल्याने जेलमध्ये ट्रेलर लाँच सोहळा करावा असे ठरले. खूप वेगळा असा चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. चित्रपटातील डायलॅाग्स सध्या खूप व्हायरल होत आहेत. त्यात नुकतेच प्रदर्शित झालेले गाणेही धुमाकूळ घालत आहे’’. या चित्रपटात अंकुश चौधरीसह किशोर कदम, राजेंद्र शिसटकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मेला चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल.