मराठी चित्रपटसृष्टीमध्ये निळू फुले हे नाव अजूनही आदराने घेतलं जातं. त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी दिलेलं योगदान अमुल्य आहे. निळू फुले यांनी एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले. ‘बाई वाड्यावर या’ हा संवाद आजही ऐकला की, प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर निळू फुलेंचा चेहरा उभा राहतो. अनेक विनोदी कार्यक्रम तसेच पुरस्कार सोहळ्यांमध्येही या संवादाचा वापर झालेला आपण पाहत आलो आहोत. पण ‘बाई वाड्यावर या’ हा संवाद निळू फुलेंनी म्हटलेलाच नाही असा दावा त्यांची लेक गार्गी फुलेने केला आहे.
गार्गीने अगदी ठामपणे मत मांडलं. कोणत्याच चित्रपटात निळू फुलेंनी हा संवाद म्हटला नसल्याचं गार्गीचं म्हणणं आहे. ‘वास्तव कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत गार्गीने खुलासा केला. ती म्हणाली, “मी खरं सांगते बाबांच्या एकाही चित्रपटात बाई वाड्यावर या हा संवाद म्हटलेला नाही. तुम्ही शोधून दाखवा हे मी अनेकांना सांगते. मीही अजून शोधत आहे. मी त्यांचे अनेक चित्रपट पाहिले. पण बाई वाड्यावर या हे बाबा कुठेही म्हटलेला नाही. मला बाबाची तिच इमेज मोडायची आहे. नव्या पिढीला जर निळू फुले कळायचे असतील तर बाई वाड्यावर या हीच इमेज त्याची नाही”.
“त्याने समाजकारण, समाजकार्य केलं. अनेक वर्ष तो लढला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये कामगारांसाठी जो लढा उभा केला तो बाबा, मिथून चक्रवर्ती सारख्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे. तो लोकांपर्यंत पोहोचतच नाही. हे सगळं लोकांना कळलं पाहिजे. जेव्हा प्रसाद ओक माझ्याकडे आला तेव्हा त्याने मला विचारलं की, निळू भाऊंवर आपण बायोपिक करुया का?. तेव्हा सुरुवातीला मला असं वाटलं की, काय गरज आहे नको”.
आणखी वाचा – Video : मेंढपाळाच्या पोरानं करुन दाखवलं, IPS अधिकारी बनला, गरिबी अनुभवल्यानंतर सुखाची भाकरी
“कारण बाबालाच ते कधी आवडलं नसतं. त्याने म्हणूनच आत्मचरित्र कधी लिहिलं नाही. कारण तो म्हणालेला की, मला आत्मचरित्रामध्ये खोटं लिहिणं जमणार नाही. आणि खरं लिहेन ते लोकांना आवडणार नाही. पण नंतर फार विचार करुन जाणवलं की, बाई वाड्यावर या हिच त्याची प्रतिमा नाही. म्हणून आम्ही ठरवलं की चल करुयात. प्रसादलाही कळवलं. किरण यज्ञोपवतीने हा चित्रपट उत्तम लिहिला आहे”. आता लवकरच निळू फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे.