Jammu And Kashmir Pahalgam Attack : गेल्या दोन दिवसांपासून अवघा देश हादरला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेला हल्ला पाहून देशभरातील मंडळी आक्रोश करत आहे. आपापल्या परीने संताप व्यक्त करत आहेत. या भीषण हल्ल्यामध्ये कोणी आपला पती, कोणी मुलगा, कोणी वडील तर कोणी जवळचा मित्र गमावला. पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या लोकांचे पार्थिव जेव्हा घरी आणण्यात आले तेव्हा समोर असणारं चित्र काळजात धडकी भरवणारं होतं. काही कुटुंबातील तर कर्ते पुरुषच हल्ल्यामध्ये मृत पावले. दरम्यान कलाकार मंडळींनी याबाबत संताप व्यक्त केला. सरकारकडे दहशतवाद्यांना धडा शिकवा अशी मागणी केली. यामध्ये दुःखाची बाब म्हणजे मराठी अभिनेत्याने मात्र त्याचा जवळचा मित्र गमावला. याबाबतच त्याने आता पोस्ट शेअर केली आहे. (pahalgam terror attack news)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारुन पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये पुरुष पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलं. महाराष्ट्रातीलच जवळपास ६ जणं यामध्ये मृत पावले. पहलगाममध्ये झालेल्या गोळीबारात डोबिंवलीतील तीन, पुण्यातील दोन तर नवी मुंबईतील एकाचा समावेश आहे. सुप्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडेंचा मित्र यामधीलच एक आहे. त्यांनी या हल्ल्यात जवळच्या मित्राला गमावलं.
प्रवीण म्हणाले, “आतंकवाद आज घरात आला. माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष आम्हाला माफ कर. आम्ही काहीच करु शकत नाही”. त्यांनी शेअर केलेली ही पोस्ट पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. तसेच नेटकऱ्यांनी कमेंट करत संतोष जगदाळे यांना श्रद्धांजली वाहिली.
आणखी वाचा – हाताला काळी पट्टी बांधून १३ दिवस दुःख पाळणार, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा निर्णय, म्हणाल्या, “दिखावा नाही…”
संतोष जगदाळे हे पुण्यातील व्यावसायिक होते. धर्माबाबत विचारत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या २६ वर्षीय मुलीने याबाबत माहिती दिली. लेकीला डोळ्यासमोरच वडिलांचा मृतदेह पाहावा लागला. हे अत्यंत दुर्देवी आणि मन हेलावणारं आहे. प्रवीण यांच्यासह त्यांच्या पत्नीनेही पहलगाम हल्ल्याबाबत पोस्ट शेअर केली होती. स्नेहल म्हणालेल्या, “त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या. त्यांच्याबद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही खेदाची बाब आहे. मला उघडपणे घाण बोलायचं आहे. खूप शिव्या देऊनही मन शांत होणार नाही”. प्रवीण व स्नेहल यांच्यासारखीच मनस्थिती आज अनेक देशवासियांची आहे.