सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वालाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ५८व्या वर्षी त्यांनी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. नितीन देसाई यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. शिवाय त्यांच्या आत्महत्येनंतर विविध चर्चाही होत आहेत. नितीन देसाई आर्थिक अडचणीमध्ये होते का? असाही प्रश्न निर्माण झाला आहे. अशामध्येच आता मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी नितीन देसाई आत्महत्येप्रकरणी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. (Nitin Desai Suicide Case)
आर्थिक अडचणींमुळे नितीन देसाई यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. असं असतानाच जितेंद्र पाटील यांनी केलेला दावा चर्चेचा विषय ठरत आहे. ‘टिव्ही ९’शी बोलताना जितेंद्र यांनी नितीन देसाई यांच्याबरोबर असलेल्या नात्याविषयी भाष्य केलं. तसेच यावेळी त्याने कलाक्षेत्रातील काही नामवंत व्यक्तींवर आरोप केले आहेत.
जितेंद्र पाटील म्हणाले, “नितीन चंद्रकांत देसाई यांना आम्ही आवडीने दादा म्हणायचो. आठवड्यातून दोन ते तीन दिवस आमची चर्चा व भेट व्हायची. ते कुठे बाहेर असतील तर मलाही बोलवायचे. राजकारण व कलाश्रेत्रापलिकडे त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व होतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून ते अस्वस्थ होते. आर्थिक चणचण तर होतीच. परंतु, कलाक्षेत्रातीलच काही नामांकित व्यक्तींनी एनडी स्टुडिओमध्ये चित्रीकरण होऊ नये म्हणून प्रयत्न केले”.
“माझ्याशी या सगळ्या गोष्टींबाबत ते संवाद साधायचे. पण या सगळ्या गोष्टी खरंच खूप क्लेशदायक आहेत. दादांना आज सगळे श्रद्धांजली वाहत असतील. मात्र या मुळ गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष गेलं पाहिजे. सुप्रसिद्ध मराठी कलावंत आज हरपला. या सगळ्याला कारणीभूत कोण? याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. एनडी स्टुडिओमध्ये होणाऱ्या शूटिंग रद्द केल्या जायच्या. चित्रीकरण रद्द होण्यामागे दिग्दर्शक-निर्मात्यांवर कोण दबाव टाकायचं? या गोष्टींचा शोध घेतला पाहिजे. एनडी स्टुडिओमध्ये चित्रीकरण होणं कोणामुळे बंद झालं हा प्रश्नच आहे”. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सध्या पोलिस तपास करत आहेत.