लग्न करायचं वय नेमकं काय?, तू अजूनही लग्न का करत नाहीस? असे कित्येक प्रश्न पंचवीशी ओलांडलेल्या मुला-मुलींना विचारले जातात. खरं तर लग्नाबाबत आताच्या तरुण पिढीचे विचार काही वेगळेच आहेत. आधी स्वतः आर्थिकरित्या सक्षम व्हायचं त्यानंतरच पुढील आयुष्याचा विचार करायचा. हिच विचारसरणी तरुण पिढीची आहे. कलाक्षेत्रातील मंडळीही याच विचारसरणीशी सहमत असलेले दिसतात. लवकरच लग्न झालं पाहिजे असा काही अट्टाहास नसतो. असंच काहीसं मराठी अभिनेत्री शितल क्षीरसागरबाबत आहे. शितलने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांमध्ये कलाकार म्हणून स्वतःला सिद्ध केलं. मात्र त्यादरम्यान लग्नाचा विषय दूर सारला. लग्नसंस्थेबाबत, तसेच लग्न करण्यावरुन तिचं मत आता शितलने मांडलं आहे. (Marathi Actress Sheetal Kshirsagar)
आदर मिळत नाही
ITSMAJJA शी संवाद साधताना शितलला तिच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. “लग्न न झाल्यामुळे नेहमीच्या जीवनात काही प्रसंगांना सामोरं जावं लागतं का?” असा प्रश्न विचारला गेला. यावर ती म्हणाली,“मला सहजासहजी आदर मिळत नाही. मला तो कमवावा लागतो. लग्न झालेल्या स्त्रीला ती कोणाची तरी बायको, काकी, मामी, सून म्हणून आदर मिळतोच. ती जरी कधी नकळत चुकीची वागली तरी तिच्याकडे दुषित नजरेने पाहिलं जात नाही. तसेच एकाच चौकटीतील स्त्री म्हणून तिला बोललं जात नाही”.
जोडीदारासाठी अट्टाहास नाही
“पण जर काही विविध कारणांमुळे तुमचं लग्न झालेलं नसेल तर गोष्टी कमवाव्या लागतात. ही काय अभिनेत्री आहे ना त्या अशाच वागतात हा टॅग मला लागू शकतो. त्यामुळे कायम जागरुक राहणं, आपल्या वागणूकीमुळे, बोलण्यामुळे काही विपरीत अर्थ तर होणार नाही ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ज्याला जी मतं माझ्याबद्दल बनवायची आहेत ते होणारच आहे. आई-वडील सोडले तर इतर कोणालाही उत्तर द्यायला तुम्ही बांधिल नसता. तुम्ही तुमच्याशीही खोटं बोलू शकत नाही. जोडीदाराची गरज असते. पण तो असलाच पाहिजे असा अट्टाहास नाही. सध्या मी माझ्यामध्ये आणि माझ्या आजूबाजुला असलेल्या मोजक्याच मंडळींमध्ये खूश आहे”.
लग्नासाठी स्थळ आली पण…
पुढे शितल म्हणाली, “ज्या वयात मला लग्नाची स्थळ येत होती तेव्हा मुलांचं असं होतं की, अभिनयक्षेत्रात काम करणारी मुलगी नको. बऱ्याचदा हे क्षेत्र सोड असं ते मला सांगत होते. तेव्हाच अभिनेत्री म्हणून मला एक आत्मविश्वास येत होता. विविध प्रोजेक्ट्स माझ्याकडे येत होते. त्यामुळे तेव्हा या गोष्टींसाठी माझी तयारी नव्हती. हे सगळं सोडून मी लग्न करावं असं वाटलं नाही. त्यामुळे माझे मुळ घोडे तिथेच अडकले. अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करायची माझी तेव्हा जिद्द होती. मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मी टाळल्या”.