Pune Rape Case : स्वारगेट बस स्थानक शब्द कानी पडला किंवा वाचनात आला तरी आता गेले तीन-चार दिवस फक्त संताप होतोय. निष्पाप मुलीला काय काय सहन करावं लागलं असेल याची कल्पनाही करवत नाही. त्या जीवाला नक्की काय वाटलं असेल हो… बातम्या जशा समोर आल्या तसं प्रत्येकाने आपापल्या परीने मतं मांडली. काहींनी तर अक्षरशः आपल्या घरातही महिला आहेत हे विसरुन बरळायला सुरुवात केली. असंख्य प्रश्न मनात असताना मी माझ्या ऑफिसमधल्या सहकर्मचाऱ्यांनाही या घटनेबाबत त्यांचं मत विचारलं. पण शेवटी काय चर्चा करुनही निष्पन्न काहीच झालं नाही. त्या नराधमाने मुलीवर अत्याचार करुनही जबाब काय नोंदावला तर आमचे सहमतीने संबंध झाले. हे ऐकून तर त्याचा आता जाऊन जीव घ्यावा असं वाटलं. शेवटी सत्य कधी समोर येणार हा प्रश्न पडलाच.
सहमतीने संबंध झाले असं आरोपीचे वकील सतत ओरडून सांगत आहेत. याचाच कहर म्हणजे वकील म्हणे मी अजूनही आरोपीला भेटलो नाही. आरोपी दत्ता गाडेची भेट न होऊनही वकील तर्क लावत आहेत म्हणजे कमालच ना… शिवाय सहमतीने झालेले संबंध आणि त्यानंतर पळून जाणं हे काही अजूनही मलाच काय माझ्यासारख्या कित्येकांना रुचलं नाही. पण आज मी आणि माझ्यासारख्या कित्येक महिला तुझ्या बाजूने विचार करत आहोत तर अंगावर काटाच येतो. गेले तीन-चार दिवस प्रत्येकजण उठून काहीही बरळत आहे. ते ऐकून आम्हालाच राग येतोय मग तुझी (पीडित मुलीची) परिस्थिती काय झाली असेल गं…
आणखी वाचा – देशमुखांच्या कुटुंबियांचा विचार तुम्ही तरी केला का?
राजकीय नेत्यांनी तर तुझ्यावर वारच केले गं. एक आवाज न उठवणारी स्त्री अशा नजरेने पाहत त्यांनी तुझ्या संस्कारांवर ताशेरे ओढले. तर काहींनी तुझ्याबरोबर झालेल्या या हल्ल्यातून इतर मुली सावध व्हाव्यात म्हणून उपदेशाचे डोसही दिले. या सगळ्यात तुझ्या मनाचा, तुझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा कोणीही विचारसुद्धा केला नसेल का?.
नेहमी आपण बोलतो, ‘ही बोलण्याची योग्य वेळ नाही’, तर हे त्यांना तुझ्याबद्दल बोलताना कळलं नसेल का?. तुझं हे दुःख तुझ्याशिवाय इतर कोणीही समजू शकत नाही, यांत दुमत नाहीच. तर तुझ्या कुटुंबियांवर आलेलं हे संकट त्यांना तरी पेलवता येणारं आहे का?. नाही माहित तुझ्या घरी कोण आहे पण तुझ्या घरातल्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारही करवत नाही. समाजात माझ्या मुलीला यापुढे मिळणारं स्थान, तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या विचाराने तुझं कुटुंब हतबल झाले असेल गं… गावात, भावकीत विचारले जाणारे प्रश्न या सगळ्या सगळ्याचा विचार करुन त्यांचं आणि तुझंही डोकं सुन्न झालं असेल ना?…

तुझ्याबरोबर घडलेली ही घटना शासकीय आवारात घडली याचं फार वाईट वाटतं. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत असताना आणि पुणे शहर हे विद्येचे माहेरघर असताना ही धक्कादायक घटना घडली याची चीड येते. महाराजांच्या साम्राज्यात कोणत्याही स्त्रीकडे मान वर करुन बघण्याची एकाचीही हिंमत नव्हती. इतकंच काय तर शत्रूंच्या आई-बहिणींचाही त्यांनी कायम आदर केला. या अशा दैवताच्या भूमीत तुझ्यावर ओढवणारा हा अतिप्रसंग मन हेलावणारा आहे.
आणखी वाचा – “औरंगजेब उत्तम प्रशासक” म्हणणाऱ्या अबू आझमींना हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज?
यापुढे तुझ्याबरोबर घडलेल्या या घटनेच्या अनेक बातम्या येतील. प्रत्येकजण तुझ्याबाबत वेगवेगळं मत मांडेल, यांत तू खंबीर राहा. ज्या हिंमतीने तू पोलिसांत जात तक्रार नोंदवलीस त्याच हिंमतीने तू स्थिर राहून कुटुंबाला आधार दे. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या मदतीने गुन्हेगार तर अटक झाला आहे त्याला योग्य ती शिक्षा नक्कीच मिळेल पण याने तुला न्याय मिळणार का? याचं उत्तर कायम अपूर्णच राहील.