Abu Azmi Video : ‘छावा पाहिला का?’, ‘थिएटरमध्ये जाऊन बघ हा छावा’, ‘कसा वाटला छावा?’, असे अनेक प्रश्न सतत कानावर येत होते. अर्थात आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगणारा हा चित्रपट प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाने पाहण्याजोगा आहेच. इतिहास नेमका काय आहे? याचे धडे या सिनेमात गिरवले आणि या चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवले. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी भावना मांडल्या, आपल्या राजाचे हाल काहींना पाहावले नाहीत. अनेकांनी थिएटरमध्येच आक्रोश केला. चित्रपट प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट राजाच्या लेझीम नृत्यावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला तेव्हा दोन पावले मागे येत दिग्दर्शकाने हा भाग काढला. २ तास ३५ मिनिटांच्या या चित्रपटात ३० सेकंद दाखवण्यात आलेला आपल्याराजाचा आनंदही अनेकांना पाहावला नाही. याचं फार वाईट वाटतं. हिच भर कमी होती की काय तर आता एका वादग्रस्त विधानाने नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
“औरंगजेब उत्तम प्रशासक होता” असं विधान चक्क दुसरं तिसरं कोणी नव्हे तर नेते अबू आझमींनी केलंय. आपल्या राजाचे ज्यांनी ४० दिवस हाल केले, त्यांच्यावर अत्याचार केले. त्यांचे डोळे काढले, नखं काढली, जीभ छाटली, चामडी सोलून काढली…हे लिहितानाही हात थरथर कापतात, डोकं सुन्न होतं. त्यांची प्रशंसा एका जबाबदार राजकीय नेत्याने का करावी? इतकंच नव्हे ‘छावा’ चित्रपटात दाखवलेला इतिहासच चुकीचा होता असं हे महाशय बरळले.
आणखी वाचा – शिवशाहीत ‘ती’ फसली, अत्याचार सहन करुनही दोष तिलाच का?
समाजवादी पक्षाच्या आमदाराने मुघल शासक औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून रक्त खवळतं. “औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्यावेळी आपला जीडीपी २४ टक्के होता. भारत देशाची ओळख त्यावेळी ‘सोने की चिडिया’ अशी होती. मग त्या औरंगजेबाला वाईट म्हणू का मी?, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती राज्य कारभाराची होती आणि हिंदू व मुस्लिम अशी नव्हती”, असं वक्तव्य करणाऱ्या अबू आझमींनी नक्की इतिहासाचा अभ्यास केला आहे का?, बहुदा, नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ सिनेमा त्यांनी पाहिला नसावा.
अच्छा, इतक्या वर्षांनंतर अबू आझमींनी खरा इतिहास सांगितला का?. औरंगजेब उत्तम प्रशासक होता, चांगला माणूस होता. त्याच्या चांगुलपणाचं वर्णन छानपैकी त्याने मंदिर तोडली, हजारो मंदिरं आणि हिंदू देव-देवतांच्या मुर्ती उद्धवस्त केल्या असं करावं का?. हो, औरंगजेब खूप चांगला माणूस होता. हजारो बायका त्याने पळवल्या, हजारो बायकांवर बलात्कार केले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्याच्याविरोधात उगीचच लढले. एवढ्या चांगल्या माणसाच्या विरोधात आमचे महाराज का बरं लढले असतील?, हा प्रश्न पडतोय. महाराष्ट्रात राहणाऱ्या त्याहून महत्त्वाचं म्हणजे राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या या प्रतिष्ठीत व्यक्तीने केलेल्या विधानानंतर त्याला कधीही माफ करणार नाही. आज अबू आझमी यांच्या वक्तव्याने संपूर्ण महाराष्ट्रात रागाची लाट उसळली.
आणखी वाचा – सायली संजीवचं मालिकाविश्वात कमबॅक?, म्हणाली, “नकारात्मक भूमिका…”
तर आता या प्रकरणात नेतेमंडळींनी भाष्य करत आझमींचा खरपूस समाचार घेतला आहे. “चांगला प्रशासक म्हणणाऱ्या अबू आझमींनी माफी मागितली पाहिजे. राष्ट्रपुरुष, देशभक्त संभाजी महाराजांचा त्यांनी अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान या राज्यात कोणीही सहन करणार नाही. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांनी माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही”, अशा कठोर शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शाळा घेतली. तर महाराष्ट्रातील इतरही नेते मंडळींनी आझमींच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. इतकंच काय तर आमच्या महाराजांचा अपमान करणाऱ्याला हत्तीच्या पायदळी तुडवण्याची गरज आहे का? याचाही विचार करणं गरजेचं आहे. अबू आझमींसारख्या व्यक्तींना कठोर शिक्षा झाली तर पुढे कोणीही महाराजांचा अपमान करण्याची हिंमत करणार नाही एवढंच…