Santosh Deshmukh Murder Case : स्वारगेट डेपो बलात्कार प्रकरण ताजं असतानाच महाराष्ट्रात आणखी एका घटनेमुळे खळबळ माजली. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरले. ते पाहून पायाखालची जमीनच घसरली. माणसातली माणुसकीच संपलीय का? हा प्रश्न आपसुकच मी स्वतःला विचारला. मन हेलावून टाकणारे ते फोटो पाहून माणुसकीचा अंत होत आहे याची खात्री पटली. व्हायरल फोटोंनंतर क्रूरतेचा कळस गाठणारी ही घटना एका विचित्र वळणावर येऊन ठेपली. मात्र राजकारणाच्या घाणेरड्या दलदलीत फसले ते देशमुखांचे कुटुंबिय… आपल्या माणसाचा असा जीवघेणा अंत पाहणं म्हणजे कुटुंबियांसाठी नरक यातनाच… पाईपला वायर गुंडाळून तो तुटेपर्यंत मारहाण, रक्तबंबाळ, न सोसणारे घाव, अंतर्वस्त्र काढून घेतलेली सेल्फी, पाणी मागताच… छे छे लिहिण्यासाठीही हात हिंमत करत नाही इतकं घाणेरडं कृत्य. काय म्हणावं या प्रकाराला या घाणेरड्या वृत्तीला…
संतोष देशमुखांच्या या हत्या प्रकरणानं महाराष्ट्र नुसता हादरला नाही तर, या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालंय. याबरोबरच ढवळून निघालेत ते देशमुखांचे कुटुंबीय… देशमुखांची लेक पत्नी, आई, भावाचं जन्मभराचं कधीही न भरुन निघणारं नुकसान… घरातील कर्ताधर्ता कायमचा नाही याचं दुःख पचवत असतानाच समोर आले ते हत्येचे फोटो. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडली तरी आपला जीव खाली वर होतो. इथे तर प्रत्यक्षात एका आईने मुलाला, पत्नीने तिच्या नवऱ्याला, मुलीने वडिलांना मृत अवस्थेत पाहिलंय… ते अमानुष फोटो पाहून आपल्या डोळ्यांत पाणी आलं मग त्या कुटुंबाच्या जीवाची काय घालमेल झाली असेल हो… जीवाच्या आकांताने ढसाढसा रडूनही हे दुःख आयुष्यभर माथी घेऊन फिरणं आहेच…
देशमुखांच्या भावाने तर रडत रडत प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया काळजावर घाव घालणारी होती. “गावात कुठेही विचारा आम्ही दोघं वेगवेगळे कुठेच फिरलो नाही. इतकंच काय तर आमचे आतापर्यंतचे सगळे फोटोही एकत्रच. एकही आमचा फोटो वेगवेगळा नाही”, असं म्हणत देशमुखांच्या भावाच्या अश्रूंचा बांध फुटला. तर त्यांची आई, लेक, पत्नी आज ना उद्या आपल्या माणसाला न्याय मिळेल या अपेक्षेवर आहेत. न्याय आणि न्यायव्यवस्थेकडून असलेली अपेक्षा यामध्ये देशमुखांचे कुटुंबीय सध्या अडकले आहेत.
अर्धवट राहिलेला संसार, जबाबदाऱ्या, मुलीचं शिक्षण या गोष्टी आता नवरा नाही म्हटल्यावर घरातील बाईच्या अंगावर आल्याच. त्यातही खंबीरपणे लढायचं अशी मनाची समजूत काढेपर्यंत हत्येचे फोटो समोर आले आणि कुटुंबीयांचा थरकाप उडाला. राजकारणी, तुम्ही-आम्ही, देश-राज्यासाठी हा फक्त चर्चेचा विषय असेल पण देशमुखांच्या कुटुंबियांसाठी आयुष्यभराच्या वेदना आहेत. पण आता पुन्हा प्रश्न भेडसावतो तो देशमुखांना, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार का?.
संतोष देशमुखांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरी एक आरोपी अजूनही फरार. न्याय मिळणं तर दूरच आरोपी कुठे आहेत याचा शोध सुरु होता मग या शोधाला तीन महिने का लागले असतील बरं?. तब्बल तीन महिन्यांनी या प्रकरणासंबंधित अत्यंत भयानक पुरावे समोर आले. मग फोटो व्हायरल करणं हाही आखलेला डाव होता का? हा प्रश्नही आहेच. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रभर सुरु असलेली चर्चा पाहता बेहती गंगा मैं कोणीही उठून हात धुवू नये इतकंच… खरंच देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असाल तरच बोलावं… मग तो राजकारणी असो वा राज्यातील नागरिक… कारण तुम्ही तोंडाला येईल ते बोलता मात्र याचा त्रास आणि संताप होतो तो त्यांच्या कुटुंबियांना… देशमुखांना जितक्या यातना सहन कराव्या लागल्या तितक्याच किंबहूना त्यापेक्षा जास्त यातना त्यांच्या मारेकऱ्यांना सहन करायला लावा. भरचौकात त्यांना फाशी द्या. तरच यांच्यासारख्या अनेक नराधमांच्या वाईट कृत्यांना भविष्यात आळा बसेल… अन्यथा देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पुन्हा मोकाट सुटले तर महाराष्ट्रातील माणूसकीने जागीच श्वास सोडला असं समजावं…