Achyut Potdar death : ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या अचानक निधनाच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. यापाठोपाठ आता मराठी सिनेविश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. आज १९ ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती समोर आली आहे.
अच्युत पोतदार यांनी आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवण्यापूर्वी अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते आणि नंतर त्यांनी इंडियन ऑइल कंपनीत काम केले. अभिनयाच्या आवडीमुळे त्यांनी १९८० मध्ये चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर त्यांनी चार दशकांहून अधिक काळ आपले अभिनय कौशल्य दाखवले.
‘आक्रोश’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘अर्ध सत्य’, ‘तेजाब’, ‘परिंदा’, ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘दिलवाले’, ‘रंगीला’, ‘वास्तव’, ‘हम साथ साथ है’, भाई’, ‘दबंग 2’ आणि ‘व्हेंटिलेटर’ यांसारख्या सिनेमांमध्ये अच्युत पोतदार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ चित्रपटात प्राध्यापकाची भूमिका साकारुन या चित्रपटातील त्यांचे डायलॉगही बरेच फेमस झाले. आणि त्यांच्या या डायलॉगचे अनेक मिम्सही व्हायरल झालेले पाहायला मिळाले. चित्रपटांबरोबर ते मालिकाविश्वातही सक्रिय होते. ‘वागले की दुनिया’, ‘माझा होशील ना’, ‘मिसेस तेंडुलकर’ आणि ‘भारत की खोज’ या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत छोटा पडदा गाजवला.





